तुझं असणं....
भरतीच्या
लाटेसोबत वाहत येऊन
चंदेरी
वाळूत रुतलेल्या शिंपल्यासारखं
तुझं
असणं....
वाळूतच
रुतलेले माझे समांतर अस्तित्व
परतणाऱ्या
लाटेसोबत तू परतत नाहीस
आणि मी ही
वाळूत पाय रोवून....
खालून
असंख्य कण सरकतात....
पण ना तू
सरकत आहेस न मी सरकतेय....
शिंपल्यातल्या
मोत्यासारखे तुझे शुभ्र पाश
अदृश्य....
आहेत आणि
नाहीतही
अथांग
वाळूतल्या मृगजळासारखे....
ते पाश खुणावतात मला
कदाचित.... म्हणूनच....
मी
रेंगाळतेय....
तुझ्या
अवतीभवती...
कदाचित अशीच
रेंगाळेन
अनिमिष....