Responsive Ad
Showing posts with label Poem. Show all posts
Showing posts with label Poem. Show all posts

Sunday, 28 July 2019

वादळात....





ती नांदतेय एका वादळासोबत,
ती जगतेय एका वादळासोबत
ती संभाळतेय छत वादळात,
ती सावरतेय भिंती वादळात,
ती जपतेय वादळाला वादळात,
ती सोसतेय वादळाला वादळात,
ती भिडतेय वादळाशी वादळात,
ती झुंजतेय वादळाशी वादळात,
ती लाख लाख वीजा खेळवते वादळात
ती बनतेय पहा वादळ झपाटलेल्या वादळात....



कळी...



माझे डोळे शोधतात तुला तेंव्हा तरी येऊन जा
माझ्या हातावरची एक रेघ तुझ्या कपाळी घेऊन जा....
विसर माझं प्रेम विसर माझं समर्पण
तुझ्या एकलकोंड्या रात्रींसाठी तरी माझं चांदणं घेऊन जा....
एक कूस माझी ओली एक तुझी कोरडी
तुझ्या दगड गोट्यांच्या वाटेसाठी एक निर्झर घेऊन जा....
थोडे रेंगाळू दे तुझे पाय माझ्या खोपटापाशी
तुझ्या अजस्त्र बागेसाठी एक तुळस घेऊन जा....
तुझ्या अंगणातला प्राजक्त तुझ्याच अंगणात बरसू दे
माझ्या ओंजळीत फक्त एक कळी देऊन जा...

Thursday, 12 October 2017

पल्याड

पल्याड
तू अल्याड यायला तयार नाहीस,
अन मला पल्याड येण्याची बंदी...
तू न-कृत्याने घाव घालतोस
मी शोधत बसते कवड्या कवड्यांची संधी...
तुझा प्रांत माझा नाही कि
तुझा देश माझा नाही...
मी झेपावले कितीही
तरी प्रवेश मला नाही...
तू अंधाऱ्या गुहेत चाचपडतोस
म्हणून मी प्रकाशवाटा शोधते
पण तुला गुहाच प्यारी
तेंव्हा मी डोळे घट्ट मिटून प्रकाशाशी झुंजते
तू मला फुलपाखरू होऊ देत नाहीस
फक्त कुरतडत राहतोस भावनांचे कोष
मी गर्भगळीत उसासे मोजते
आजन्म उसवित स्वत:चेच दोष....
-    समिधा