पल्याड
तू अल्याड यायला तयार
नाहीस,
अन मला पल्याड
येण्याची बंदी...
तू न-कृत्याने घाव
घालतोस
मी शोधत बसते कवड्या कवड्यांची संधी...
तुझा प्रांत माझा नाही कि
तुझा देश माझा
नाही...
मी झेपावले कितीही
तरी प्रवेश मला
नाही...
तू अंधाऱ्या गुहेत
चाचपडतोस
म्हणून मी प्रकाशवाटा
शोधते
पण तुला गुहाच प्यारी
तेंव्हा मी डोळे घट्ट
मिटून प्रकाशाशी झुंजते
तू मला फुलपाखरू होऊ
देत नाहीस
फक्त कुरतडत राहतोस भावनांचे कोष
मी गर्भगळीत उसासे
मोजते
आजन्म उसवित स्वत:चेच
दोष....
-
समिधा