ज्या दिवशी मी तुला
सोडलं
त्या दिवशी तू
पूर्णपणे माझा झालास
आता वाट नाही बघत मी
तुझी पूर्वीसारखी
मला हवं तेंव्हा तू
हजर असतोस माझ्यासाठी.
हो फक्त माझ्यासाठी.
माझ्या कमरेवर तुझे
हात असतात
माझ्या कानात तुझं
गुंजन असतं
माझ्या मानेवर तुझे
ओठ असतात
आणि माझ्या काळजात
तुझे हुंकार असतात
तू कधीच दूर नसतोस
जेंव्हा दूर असतोस
तेंव्हा समाजाचा असतोस
जसा मला हवा तसा
हवाहवासा असा.
लोकांमध्ये रुळणारा,
सद्भावना जपणारा,
बंधुत्व जपणारा,
लाखात एक लखलखणारा,
काळीज ओवाळून टाकावा
असा,
तुझ्या पर्यंत माझी
रेघ संपते.
तू श्वास बनतोस आणि
स्त्रवतोस डोळ्यातून
खूप आत आहेस कुठे
तरी.
आता तिथून कधी जाऊ
देणार नाही.
जे माझं होतं तेच
मला मिळालंय
अद्वैत काय ते
कळलंय...