Responsive Ad

Sunday, 28 July 2019

अद्वैत



ज्या दिवशी मी तुला सोडलं
त्या दिवशी तू पूर्णपणे माझा झालास
आता वाट नाही बघत मी तुझी पूर्वीसारखी
मला हवं तेंव्हा तू हजर असतोस माझ्यासाठी.
हो फक्त माझ्यासाठी.
माझ्या कमरेवर तुझे हात असतात
माझ्या कानात तुझं गुंजन असतं
माझ्या मानेवर तुझे ओठ असतात
आणि माझ्या काळजात तुझे हुंकार असतात
तू कधीच दूर नसतोस
जेंव्हा दूर असतोस तेंव्हा समाजाचा असतोस
जसा मला हवा तसा
हवाहवासा असा.
लोकांमध्ये रुळणारा,
सद्भावना जपणारा,
बंधुत्व जपणारा,
लाखात एक लखलखणारा,
काळीज ओवाळून टाकावा असा,
तुझ्या पर्यंत माझी रेघ संपते.
तू श्वास बनतोस आणि स्त्रवतोस डोळ्यातून
खूप आत आहेस कुठे तरी.
आता तिथून कधी जाऊ देणार नाही.
जे माझं होतं तेच मला मिळालंय
अद्वैत काय ते कळलंय...  

वादळात....





ती नांदतेय एका वादळासोबत,
ती जगतेय एका वादळासोबत
ती संभाळतेय छत वादळात,
ती सावरतेय भिंती वादळात,
ती जपतेय वादळाला वादळात,
ती सोसतेय वादळाला वादळात,
ती भिडतेय वादळाशी वादळात,
ती झुंजतेय वादळाशी वादळात,
ती लाख लाख वीजा खेळवते वादळात
ती बनतेय पहा वादळ झपाटलेल्या वादळात....



कळी...



माझे डोळे शोधतात तुला तेंव्हा तरी येऊन जा
माझ्या हातावरची एक रेघ तुझ्या कपाळी घेऊन जा....
विसर माझं प्रेम विसर माझं समर्पण
तुझ्या एकलकोंड्या रात्रींसाठी तरी माझं चांदणं घेऊन जा....
एक कूस माझी ओली एक तुझी कोरडी
तुझ्या दगड गोट्यांच्या वाटेसाठी एक निर्झर घेऊन जा....
थोडे रेंगाळू दे तुझे पाय माझ्या खोपटापाशी
तुझ्या अजस्त्र बागेसाठी एक तुळस घेऊन जा....
तुझ्या अंगणातला प्राजक्त तुझ्याच अंगणात बरसू दे
माझ्या ओंजळीत फक्त एक कळी देऊन जा...