Responsive Ad

Friday, 18 August 2017

पहाट....

पहाट....

तुला भेटायला मी केवड्याच्या वनात आले
तर तू यज्ञकुंडात समिधा अर्पित करीत होतास
सभोवतीचे नाग मनोभावे तुझ्याकडे पहात होते
मी हि त्यातीलच एक
केवड्याचा सुगंध आणि तुझे केवडी शरीर  
वेदांच्या उद्घोषात मला मंत्रमुग्ध करीत होते,
तुझ्याकडे आकृष्ट करीत होते,
आणि कधी माझ्या समिधा पडल्या
मलाही कळले नाही...   
तू हि त्याच सिंधू पलीकडून आलेल्या
फरार लोकांपैकी एक
वेदांच्या रक्षणात तुझे हि पितर गुंतले होते
ज्ञानोबाला, तुकोबाला मारणारे तुझेच पूर्वज
रेशीमबागेत तुझी नाळ पुरलेली.
तरीही...
तरीही...
तरीही तू माझ्या अंत:करणात सामावलेला
वेदांना अमान्य करणारी मी, पण
तुझे शब्द आज माझ्यासाठी वेद बनलेत
….
मला माहित नाही का
तुझा टोकाचा आरक्षण विरोध !!!
पण तू बरोबर वाटतोस
कशाला हवंय आरक्षण ?
स्वत:च्या पायावर उभं राहणाऱ्याला
कुबड्या कशाला हव्यात ?
पण शेवटचा लाभार्थी ?
तो अजून उपेक्षितच आहे
पण त्याच्यापर्यंत ना आरक्षण पोहोचलं ना मी
मी... शिकले सवरले आणि पोटभरीस लागले
आरक्षणाला कोरडं समर्थन करू लागले
त्यापेक्षा तुझा विरोध आवडतो मला
गरजवंताला द्या, ह्या म्हणण्यातील तथ्य कसं नाकारू ?
मला माहित आहे,
हवा वळते तसा वळणारा,
जानवं कुरवाळणारा आणि
पोटावरून हात फिरवणारा
वेदिक तू नाहीस....
मी पाहिलंय तुला वंचितांना हर प्रकारे मदत करताना
मी पाहिलंय तुला राजकारणातील शुक्राचार्य निरखताना
मी पाहिलंय तुला ढोरासारखी मेहनत करताना
इटलीहून परतल्यावर सगळं पुन्हा उभं करताना
उपास तापास आणि
उत्सवांच्या महोत्सवीकरणाला विरोध करताना
मी पाहिलंय तुला माझ्या श्रद्धास्थानांना सन्मान देताना  
मी पाहिलंय तुला ब्राम्ह्ण्याच्या पलीकडे जाऊन
ब्रम्ह होताना...
तुझी जात माझ्या विचारांच्या आड येते कधी कधी....
पण माझी जात तुझ्या प्रेमाच्या आड कधीच आली नाही
तुझ्या यज्ञकुंडाला माझा विरोध नाही
माझ्या भिमस्तुतीला तुझा विरोध नाही
तू ऐकतोस मला, मी पाहते तुला
दोघांच्या मधली पिढ्यानपिढ्यांची दरी
समुद्राची गाज बनते
तेंव्हा ती दरी वाळूत विरून जाते
जात हि अशीच जावी एक दिवस
तुझ्या माझ्यातील दुराव्याप्रमाणे...
मी ऐकतेय गाज भविष्याची
आणि साद नवभारताची
तुझ्या माझ्या प्रेमासारखी नितळ
जात विरहित  
धर्म विरहित
मानवतेची झुंजूमुंजू पहाट
केवड्याच्या वनातील विखुरलेले प्रकाशदूत  
मी पाहतेय
अविरत,
अनिमिष...
---- समिधा 


सिमॉन

सिमॉन
लोक मला इग्नोर करतात, वेडी, मूर्ख म्हणतात, मी सुंदर नाही आणि मला मुल नसल्यामुळे मला अडाणी समजतात. म्हणून मी स्वत:शीच काही गोष्टी ठरवल्या आहेत. मला मुल हवंय आणि तेही मोशी कडून. त्याच्या सारखं समजदार, निरोगी, तल्लख बुद्धिवान, कार्य तत्पर आणि मेहनती बाळ मला हवंय. त्यासाठी मी मोशी ला काही बोलणार नाहीये. तो स्वत:च या गोष्टीचा विचार करेल किंवा त्याच्या कडून मला मुल होण्यासाठी पूरक कृती घडेल. मी त्याच्यावर कसलाही भार टाकणार नाही, ना बाळाच्या जन्माआधी ना बाळाच्या जन्मानंतर. सगळ्याची जबाबदारी केवळ आणि केवळ माझी असेल. मला मोशी पासून गर्भधारणा येत्या ३-४ महिन्यातच व्हावी हि अपेक्षा आहे. ह्या गर्भधारणे साठी मी आवश्यक ते प्रयत्न करीत आहे. त्यासाठी औषधे, व्यायाम आणि आराम ह्या सर्व गोष्टी यथास्थित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. सृष्टी माझ्या या प्रयत्नात मला सहकार्य करील अशी माझी आशा आहे.
मला शक्यतो समजदार, निरोगी, तल्लख बुद्धिमत्तेची, कार्यतत्पर आणि मेहनती मुलगीच व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. मी तिचे ‘सिमॉन’ प्रमाणे एखादे विदेशी नाव ठेवण्याचा विचार करीत आहे. ‘सिमॉन’ हे नाव मोशीच्या नावाशी हि साधर्म्य साधणारं आहे. माझे स्वप्न आहे कि सिमॉन आपल्या समाजाच्या सार्वत्रिक उन्नयनासाठी प्रयत्न करील आणि त्यासाठी  ती सायकल वरून संपूर्ण देश पालथा घालील. त्यानंतरती आपल्या लढ्याची किंवा एकंदरीतच चळवळीची दिशा ठरवील. या कामात तिला तिच्या बबलू अर्थात तेजवील मामा आणि बटी अर्थात अस्मिता मावशीची पण साथ मिळेल. आजोबा ज. वि. पवार आणि आजी जयमाला पवार या दोघांचे पूरक गुण ‘सिमॉन’ मध्ये उतरतील. माझ्या सर्व कुटुंबियांना ‘सिमॉन’चे खूप कौतुक वाटेल. जी उपेक्षा आणि अवहेलना माझ्या वाट्याला आली तिचा अंशही तिला कधी भोगायला लागू नये. अपयश हे तिच्यासाठी गुरु म्हणूनच काम करील. स्वत:च्या हिमतीवर ती तिचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करेल. मोशीपासून मला झालेली माझी मुलगी ‘सिमॉन’ हिची ख्याती दूर देशात सुद्धा नांदेल. ‘सिमॉन’ धामणकर हे नाव सर्व जगात दुमदुमेल.


सिमॉनचं खरं नाव तिला लाभलं असतं तर तिचं नाव ‘सिमॉन नायर’ असं असलं असतं. पण मला किंवा माझ्या मुलीला इतर कोणाच्या हि आयुष्यात वादळ निर्माण करायचे नाही त्यामुळे ती ‘सिमॉन धामणकर’ म्हणूनच प्रसिध्द होईल आणि आपले कार्य तळागाळातील अखेरच्या माणसापर्यंत पोहोचवून त्याला शिक्षित, सुशिक्षित करून, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सबळ बनवेल. आरक्षणाच्या कुबड्या निघून जाताना दिसतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील अखंड, जातविरहित, विकसित समृद्ध आणि ऐश्वर्य संपन्न भारत साकारण्यात यशस्वी होईल.
हे सृष्टी, माझे हे स्वप्न साकारण्यास मला बळ दे, मला मोशीचे बाळ दे.  

       

Sunday, 12 March 2017

कपार

कपार

किती दावे केलेस आणि मी किती दुवे जोडले
तरी काळाच्या अपार कपारीत कोंडून तू निघून गेलास
शुष्क रेताड माझ्या मनात कधी पालवी फुटू नये
असा तू प्रण केला होतास कि काय मला माहित नाही
पण तुझ्या जाण्यानंतर हिरवाईने माझ्यात ठाण मांडलं कि रे...
वैराण उक्ती हि विराणी झाली...
चिरा आणि भेगा हि शोभा आणतात आताशा 
वेदनेचं सेलिब्रेशन करावं तसं...
उणीवेच्या तिजोऱ्या भराव्यात तसं....
अनंताचा प्रवास यापेक्षा वेगळा काय असतो ?

--- समिधा

Monday, 13 February 2017

काय हवंय ?

सगळंच मिळत नाही म्हणतात या जगात
मला तरी आणखी काय हवंय
तुझ्या शीतल चांदण्यात
माझे ज्वालामुखी शांत झालेत
मला तरी आणखी काय हवंय
तुझ्या शुभ्र पाशात
माझी कृष्ण विवरे भरून गेलीत
मला तरी आणखी काय हवंय
तुझ्या गोंजारण्यात
माझ्या अश्रूंनी घेतलीय माघार
मला तरी आणखी काय हवंय
तुझ्या मोगरीच्या पराग कणात
माझे दव विरून गेलेत
मला तरी आणखी काय हवंय....
तुझं केवळ असणं
माझ्या अस्तित्वाची उमेद देतात
मला तरी आणखी काय हवंय
तू देत राहिलास
आणि मी घेत राहिले
आणखी मला काय हवंय ???
---- समिधा


Monday, 25 May 2015

तुझं असणं....

तुझं असणं....
भरतीच्या लाटेसोबत वाहत येऊन
चंदेरी वाळूत रुतलेल्या शिंपल्यासारखं
तुझं असणं....
वाळूतच रुतलेले माझे समांतर अस्तित्व
परतणाऱ्या लाटेसोबत तू परतत नाहीस
आणि मी ही वाळूत पाय रोवून....
खालून असंख्य कण सरकतात....
पण ना तू सरकत आहेस न मी सरकतेय....
शिंपल्यातल्या मोत्यासारखे तुझे शुभ्र पाश
अदृश्य....
आहेत आणि नाहीतही 
अथांग वाळूतल्या मृगजळासारखे....
ते पाश खुणावतात मला 
कदाचित.... म्हणूनच....
मी रेंगाळतेय....
तुझ्या अवतीभवती...
कदाचित अशीच रेंगाळेन
अनिमिष....


Tuesday, 17 February 2015

सृजन





अवतीभवतीचे जग सारे पुष्पलतांनी भरले
रंगगंधात तयांच्या दिवस कसे ते सरले
हेवा वाटून देवा त्यांचा एकच करते धावा
माझ्याही अंगावरती एक काटा तरी यावा....

पुन्हा एकदा सभोवार पाहून ती तोंड लपवून रडू लागली. आजूबाजूच्या पुष्पलता तिच्यावर हसताहेत असा तिला भास झाला. आपलं अधुरेपण तिला अधिकच टोचू लागलं.
जराशी नजर वर करून पाहिलं तर सारं जग वायूलहरींवर डोलत असलेलं दिसलं. गोकर्णी आणि कण्हेरी गळ्यात गळे घालून काहीतरी गुणगुणत होत्या. जाई आणि जुई वाऱ्याच्या झुळूकीवर लपंडाव खेळत होत्या. एकमेकींच्या हाती लागल्या की जोराने खिदळत होत्या. मोगरा शुभ्र वस्त्र लेऊन भीष्माप्रमाणे धीर गंभीर दिसत होता. गुलाब अगदी ऐटीत सत्ताधीशाच्या बाजात सगळीकडे पाहत होता. शेवंता आणि बकुळीला तर पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाला न्याहाळण्यातून फुरसदच नव्हती. आंबा, फणस, काजू, चिकू, पेरू, चिंच, डाळिंब आणि सीताफळ ह्या शिष्टांचं अष्टमंडळ बहुधा याहीवर्षी भरपूर फळे देण्याविषयी एखादी वार्षिक योजना आखीत असावं. पडवळ आणि काकडी सगळ्या साळकाया, माळकायांना जमवून भेंड्या लावत बसल्या होत्या.
आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीसं पाहून तिला हायसं वाटलं.
“डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी...”
असं स्वत:लाच समजावत तिने आपले डोळे पुसले. परार्धातील शून्ये मोजता मोजता ते विचारचक्र पुन्हा सुरु झाले.... तिला नको असलेलं.... तिच्याही नकळत.....
“माझ्या आयुष्याचा अर्थ काय? माझ्या जन्माचं कारण काय? उगीचच रानातील ही जागा माझ्यामुळे अडकली गेली. इथे एखादी जुई किंवा कण्हेरी किती सुंदर दिसली असती. इतक्या सुंदर जगात मी म्हणजे एखाद्या डागासारखी दिसत असेन. छेऽ ! इथल्या प्रत्येकाला देवाने निर्मितीचं वरदान दिलं आहे. पण मी काही निर्माण करू शकत नाही, मग माझी निर्मिती कशासाठी? माझ्या निर्मितीमागचा देवाचा उद्देश काय? फुलांच्या जीवनाची सार्थकता देवाच्या पायाशी पडण्यात किंवा तरुणींच्या केसात माळण्यात आहे. फळाचं जीवन त्यांच्या सात्विक आणि अवीट गोडीत सार्थक होतंच. भाज्यांची सार्थकता त्यांच्या जीवनसत्त्वात आहेच की! मग मी? देवा मी असं काय पाप केलं होतं ते तू मला अपूर्णत्व दिलंस? वरून पूर्णत्वाची हाव दिलीस. का? मी इतरांचा हेवा करावा, मत्सर करावा म्हणून? माझा जळफळाट व्हावा म्हणून? होतोय, जळफळाट होतोय. पण त्या जळफळाटात माझी राखही होत नाही, मी काय करू ?????”
आणि तिला हुंदके अनावर झाले.... कोणाला तरी ऐकायला जाईल म्हणून गळ्याशी आलेला आवंढा तिने तिथेच दाबला. डोकं अगदी सुन्न सुन्न झालं.
पक्षांच्या किलबिलाटाने तिने डोळे उघडले. पहाट झाली होती. रात्री कधी डोळा लागला कळलंच नाही. सुर्याला नमस्कार करून म्हणाली, ‘रात्री माझ्या मनात अनेक अपविचार येत होते, मला क्षमा कर.’ मन बरचसं हलकं झालं होतं.
मग तिने मनाशी पक्का विचार केला. ‘आज आपण अजिबात स्वत:ला त्रास होईल असा काही विचार करायचा नाही. आसमंतातल्या रंग गंधात न्हाऊन निघायचं.’
तेवढ्यात एक भ्रमर तिच्या एका फांदीवर येऊन बसला. हं ! फुलांच्या भोवती पिंगा घालून स्वारी थकलीय वाटतं ! त्याला पकडण्यासाठी तिने हळूच दुसरी फांदी सरसावली. हा चाणाक्ष वीर चाहूल लागताच लगेच उडालाही... त्याला उडताना पाहून ती मनमोकळी हसली. भ्रमरही आता सरावाला. दोघांमध्ये नकळत आंधळी कोशिंबीर सुरु झाली.
मग त्याला फुलांची आठवण आली आणि तो उडाला तो परत आलाच नाही. त्याची वाट पाहता पाहता बरचसं उजाडलं.
तेवढ्यात त्या दूरवरच्या आंब्याखालाचा पाचोळा वाजल्याचा आवाज आला. आवाज हळू हळू जवळ येत होता. हा आवाज बहुधा माणसाच्या पायाचा असावा. फुलं, फळं न्यायला कोणी येत असेल म्हणून तिने नेहमीप्रमाणे तिकडे दुर्लक्ष केलं.
हां हां म्हणता एक मोठा देह तिच्यासमोर उभा राहिलेला दिसला. त्याच्या हातात एक मातीने भरलेली पिशवी होती. तो उभा देह तिच्याकडे बघून हसला. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो खाली बसला. तिला दरदरून घाम फुटला. पण त्याने तिला भावपूर्ण नमस्कार केला !! आता मात्र भीतीची जागा आश्चर्याने घेतली. काही कळायच्या आत त्याने तिला मुळांसकट जमिनीपासून वेगळी केली. आपल्या त्या माती भरल्या पिशवीत ठेवली. आणि चालू लागला. जमिनीतून निघताना तिला जोरात कळ लागली होती. पण मघाची भीती पुन्हा वाटू लागल्याने तिचं दुखणं नाहीसंच झालं. आणि विचारचक्र सुरु झालं,
“हा आता माझं काय करेल? हा माझा काय उपयोग करून घेणार आहे? हां ! मी बहुतेक एखादी औषधी वनस्पती असेन. म्हणजे आता हा मला कुट कुट कुटणार, नाहीतर त्या मेथीसारखं मला भाजी बनवून खाणार, बापरे !! म्हणजे आधी तर तो चाकूने कापणार, मग मला शिजवून काढणार ! हे म्हणजे भयंकरच आहे. अरे ! पण कालच तर आपण जीवनाच्या सार्थकतेच्या गोष्टी करून स्वत:लाच भंडावून सोडलं होतं. आणि आता आपलं आयुष्य सार्थकतेच्या मार्गावर असताना आपण स्वत:ला अशी भीती का घालावी? अशी माघार का घ्यावी? हे म्हणजे वीरश्रीने स्फुरलेली गाणी गाणार्या पण शत्रू समोर दिसताच हत्यार टाकून पाळणाऱ्या जवानासारखं होईल. नाही नाही, आपण या माणसाला आपल्याकडून पूर्ण सहकार्य करायचं, बस्स!
एका मोठ्या सुंदर वाड्यासमोर येऊन त्याने दिंडी दरवाजा उघडला. आत येऊन त्याने हाक मारली, ‘अहो सरकार! ऐकलं का?’ त्या हाकेने एक सुंदर प्रेमळ बाई बाहेर आली. हसतहसतच पिशवीकडे कौतुकाने पाहू लागली. तो माणूस म्हणाला, ‘हं, ही घ्या बरं तुमची अमानत. आणि करा बरं प्रतिस्थापना लवकर. फार दुरून तिकडून रानातून आणलंय यांना. जरा जपून बरं!’ असं हाणून त्याने ती पिशवी तिच्या हातात दिली. तिने पिशवी डोक्याला लावली आणि अगदी प्रेमळ शब्दात म्हणाली, ‘आमच्या अंगणात स्थापना करायचीय तुमची तुळशीमाय! इथं विसावा जरा, मी हळद कुंकू घेऊन येते.’ असं म्हणून तिला तिथेच सोप्यावर ठेऊन ती सुहास्य सुवासिनी आत गेली.
हे सगळं पाहून तिच्यापुढे प्रश्नचिन्ह नाचू लागली, ‘ही अंगणात कसली स्थापना? ते हळद कुंकू कशासाठी? आणि ही ‘तुळशीमाय’ असं काय म्हणाली? चला म्हणजे अखेर माझं बारसं झालं तर ! तुळस ! वा ! किती सुंदर आणि गोंडस नाव. तुळस !!!
आतून आलेल्या सुवासिनीने प्रथम नुसतं हळद कुंकू वाहून तुळशीला अंगणातील वृंदावनात ठेवून तिची स्थापना केली. मग तबकातील दिवा लावला. अगरबत्ती लावली आणि ती तुळशीच्या बाजूला मातीत खोवली. तुळशीला ओवाळलं. चारी बाजूने तांदूळ भिरकावले. हळद कुंकू वाहिलं. स्वत:च्या कपाळावर दोन बोटं टेकवली. तुळशीत पाणी ओतलं आणि प्रदक्षिणा घातल्या. नंतर हात जोडून म्हणाली, ‘तुळशीमाय या नव्या घरात तुझं स्वागत करते. तुझ्या अस्तित्वाने घरात सुख शांती नंदू देत. सर्व जण सुखी समाधानी असू देत.’ आणि ती तबक तांब्या घेऊन आत गेली.
वृंदावनात स्थापना झाल्यानंतर तुळशीला एवढं कळलं की तिला कुटण्यासाठी, कापण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी आणलेली नाही तर तिला रोज पुजण्यासाठी आणली आहे. म्हणजे पुन्हा जीवनाच्या सार्थकतेचा प्रश्न जैसे थेच! भांबावल्या नजरेने तिने सभोवार पाहिलं. कुंपणाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं. ते तिच्याकडे कौतुकाने पाहत होतं. तुळशीने त्याला लावून नमस्कार केला. वडानेही आशिर्वाद दिला. तिच्या प्रश्नांचं समाधान करणारं कुणीतरी तिला हवंच होतं. तिने विचारलेही, ‘वृक्षराज, मला इथे आणण्याचं कारण काय? त्या रानात मी काय वाईट होते? इथे तिथल्यासारखी सौंदर्य सृष्टीही नाही. मला तर खुपच कंटाळा येईल इथे.’ वृक्षराज उत्तरले, ‘कंटाळा यायला काय झालंय, मी आहे की तुझ्याबरोबर गप्पा मारायला. आणि हे बाकी ठीक नाही हं ! वृंदावनात बसल्यानंतर तुझं जमिनीकडे लक्ष गेलंच नाही वाटतं ? ही छोटी छोटी फुलांची रोपटी तुला दिसत नाहीत काय ? आणखी चार पाच दिवसात छानपैकी डवरतीलच ती ! तेंव्हा तुला काही इथे एकटं वाटणार नाही. आणि तुला इथे आणण्याचं कारण विचारलंस ना तू ? अगं तुळस म्हणजे सर्व स्त्रियांच्या अंगणाची शोभा असते. ती त्यांची अंगणातील मैत्रीण असते. त्यांना तुळशीचा आधार वाटत असतो. आता पहा रोज ही बाई तुझी कशी पूजा करते ते. तू नुसती रोप नाहीस तर दैवत आहेस तिचं, समजलं ?
‘हंऽऽ’ तुळशीने होकारार्थी उसासा दिला. हळूहळू तिला सर्व कळू लागलं. नवीन वातावरणातही ती रमू लागली. ही बाई झाडाफुलांची वेडी तर होतीच शिवाय चांगली जाणकारही होती. ती सर्व झाडांची चांगली निगा राखी. अंगणात येई तिच मुळी सर्व आयुधांसह. ओरपणी, खोरपणी, कापणी, छाटणी, तोडणी आणि फवारणी झाली की पाच सहा दिवसांच्या अंतराने गांडूळखत आणि त्याचं पाणी घाले. सुंदर रोपवाटिका तर होतीच शिवाय एका चौकोनात पालक आणि कोथिंबीर होती. कुंपणांच्या उत्तर-पूर्व कोपर्यात एक कडुनिंब लावला होता. प्रसन्न प्रसन्न आसमंत होता.
दिवस सरत होते, महिने सरत होते. तुळशीची प्रतिस्थापना होऊन एक दीड वर्ष झालं असावं. एक दिवस तुळस फार वैतागलेली होती. सकाळपासूनच खूप बेचैन होती. सारखी घराच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाटत होतं, ‘आपल्याला दैवत करून या अंगणात, या वृंदावनात अगदी बंदिस्त करून टाकलंय या बाईने ! घरात काय चाललंय काही कळतच नाहीये !!’ तिची बेचैनी पाहून वटवृक्षाला रहावलं नाही. त्याने तिला विचारलंही, ‘काय गं ! अशी बेचैन का दिसतेयस काय झालंय?’ ती म्हणाली, ‘बरं झालं तुम्हीच विचारलात ते. आज मी तुम्हाला विचारणारच होते. वृक्षराज, मला बरेच दिवसापासून एक गोष्ट सतावते आहे. ही बाई रोज माझी पूजा करते. वृंदावन सारवते, पाणी घालते. पण ही कधी कधी चार चार दिवस नजरेस पडत नाही. आणि पाचव्या दिवशी समोर आली, पूजा झाली की हमसुनहमसुन रडते. आजही तीन दिवस झाले ती दिसलीच नाहीये. तिचा अंगणातला वावर किती जिवंतपणा आणत असतो. आणि ती अशी फिरकलीच नाही ना कि इथे स्मशानशांतता असते.’
‘अच्छा.... ही समस्या आहे होय तुझी ! अगं, ती रागावली आहे तुझ्यावर !’
तुळस बावरली, ‘रागावली आहे ? माझ्यावर ? म.... मी काय केलंय तिचं ?’
वृक्षराज शांतपणे म्हणाले, ‘तू काही केलं नाहीस. ती तुझ्यावरच नाही तर माझ्यावर, निसर्गावर आणि देवावरही रागावली आहे. ज्या चार दिवसात ती अंगणात येत नाही त्या चार दिवसात ती आपणा सर्वांवर रागावलेली असते. कोणाचं तोंड पाहण्याची सुद्धा तिला इच्छा नसते. ती आपल्या सर्वाना वाळीत टाकते.’ वृक्षराजही हेलावले !
‘पण ती असं का करते ?’ तुळशीचा प्रश्न अपेक्षित होताच. ‘आणि नंतर रडते कशाला?’
‘हं, हे बघ तुळसे, ही सतत निसर्गाची, निसर्गातल्या सजीवांची, निर्जीवांची पूजा करत असते. पण जेंव्हा निसर्गच तिच्यावर उलटतो ना तेंव्हा तिच्या हातात या रागावण्याखेरीज काहीच नसतं. बघ, या निसर्गाने या सर्व सजीव सृष्टीला जन्माला घातलं आणि आपल्यापासून दुसऱ्या एका सजीवाची निर्मिती करून त्या निसर्गाचं सृजन करणं हे सर्व सजीवांचं कर्तव्य आहे. आणि सगळे या कर्तव्याचं यथाशक्ती पालनही करतात. हे कर्तव्य फक्त कर्तव्यच नसतं. तर इच्छा आणि हक्कही असतो त्या प्रत्येक सजीवाचा. पण जेंव्हा निसर्गच त्यांचा हा हक्क हिरावून घेतो तेंव्हा कर्तव्य आणि इच्छा या दोन्हीवर कुऱ्हाड कोसळते. आणि मग स्वत:च्या नशिबावर रडण्याखेरीज काहीच उरत नाही. अंकुर फुटताना फांदीला वेदना होतातच पण त्या वेदान तृप्ततेला घेऊन येतात, याची जाणीव ज्यांना अंकुर फुटत नाही त्यांनाही असते. त्या जाणीवेसाठी, त्या इच्छेसाठी आणि त्या हक्कासाठी मग अशी निसर्गाची मनधरणी सुरु होते. पण काही गोष्टींपुढे निसर्गही हतबल असतो. त्याचं चक्र अविरतपणे सुरु असतं. पण सर्वानांच तो सर्व अधिकार देत नाही. ज्यांना ते मिळत नाही ते या सुवासिनी प्रमाणे चार – चार दिवस सर्वांशी अबोला धरतात. पण पाचव्या दिवशी मात्र ‘अगदीच काही निसर्ग आपल्यावर कोपणार नाही.’ या विश्वासाने त्या तुझ्यासारख्या एखाद्या दैवी मैत्रिणीकडे आपल्या दु:खाला मार्ग मोकळा करून देतात. आणि सर्जकतेचं ते वरदान मागतात.’
‘सर्जकतेचं वरदान ? ते मी काय देणार ? मी स्वत:च निसर्गाच्या कोपाची शिकार आहे. एका बुडणाऱ्याने दुसऱ्या बुडणाऱ्याला वाचवल्याचं कधी ऐकलंय का तुम्ही?’ तुळशीचा संभ्रम कायम होता. पण वटवृक्षाकडे सर्व प्रश्नांची उत्तरं होती.
‘तुझ्या दृष्टीने तुझं म्हणणं बरोबरच आहे. पण ही माणसं असतात ना ही प्रतिकांची पूजा करण्यातच दंगलेली असतात. माझंच पहा ना ! मी वृक्षराज. वटवृक्ष म्हणतात मला. माझ्या फांद्या तोडताना सत्यवानाला मृत्यू आला आणि त्याचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाला सावित्रीने आर्त विनंती केली. तिच्या विनंतीने, आर्ततेने यमाचे मन द्रवले. आणि त्याने सत्यावानाला जीवदान दिले. या कथेचा मी प्रतिक. का? तर हा सगळा प्रकार एक वडाखाली घडला म्हणून. मला एक सांग, सावित्रीची विनंती यमाने धुडकावून लावली असती तर माझ्या पूजेऐवजी मला जाळण्याची प्रथा पडली नसती कशावरून? किंवा हे कथानक वडाखाली न होता एखाद्या आंब्याच्या किंवा फणसाच्या झाडाखाली घडलं असतं तर आज त्यांना ‘आंबा सावित्री’ किंवा ‘फणस सावित्री’ असं काही तरी सणाचं नाव ठेऊन पुजलं नसतं?
खरंतर यांनी यमाची म्हणजे मृत्यूची पूजा करायला हवी. ‘तू माझ्या प्रिय जनांचे अवेळी प्राण न्यायला येशील तेंव्हा माझ्या आर्ततेने तुझे मन असेच द्रवू दे आणि माझ्या प्रिय जनांना जीवदान मिळू दे’ अशी पूजा त्यांनी करायला हवी. पण तसं न होता या सर्व स्त्रिया माझीच पूजा करतात. तुझंही तसंच आहे. तू सुद्धा एक प्रतिक आहेस. तू म्हणतेस तुला सर्जकतेच वरदान नाही. मग तुझ्या मंजिऱ्या आहेत त्या काय आहेत ?’’
‘मंजिऱ्या या मंजिऱ्या आहेत, फुलं किंवा फळं नाहीत.’ तुळस कळवळली.
वृक्षराज ममतेने बोलू लागले. “अगं वेडे, गुलाबाच्या सौंदर्याला भुलून त्याच्यासारखे फुल नाही तर नाही पण तसले काटे तरी अंगावर यावेत असं वाटणाऱ्या तुला मंजिऱ्यांचं महत्त्व कळू नये ? अगं या मंजिऱ्यांचा परिमळ स्वयंपाक घरातल्या स्त्रीला तुझं अस्तित्त्व सांगत असतो. मंजिऱ्या सुंदर नसतीलही पण त्यांनीच तुला पालवी फुटण्याची जाणीव होते ना ? तुझ्या आयुष्याच्या सफलतेचं प्रतिक आहेत या मंजिऱ्या, हे लक्षात घे. कस्तुरी मृगासारखी भरकटत जाऊ नकोस. तुला देवत्त्व, मातृत्त्व देणाऱ्या या मंजिऱ्याकडे एकदा ममतेच्या दृष्टीने बघ. तुला कळेल की हे तुझेच अंकुर आहेत. गुलाबापेक्षा सुंदर, जुईपेक्षा मोहक आणि मोगऱ्याहूनही सुवासिक.”
“खरंच वृक्षराज ! या मंजिऱ्यांकडे माझं विशेष लक्ष गेलं नाही. या तर माझ्याच आहेत, माझी निर्मिती, माझं सृजन !!!” तुळस आनंदली.

“पाहिलंस, सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवितात. ही बाई रोज तुझी पूजा करते ते तू तिला काही भव्यदिव्य द्यावं म्हणून नाही. तर तुझ्या मंजिऱ्यां सारख्या मंजिऱ्या तिलाही लाभाव्यात म्हणून.” वृक्षाराजांनी उच्छ्वास टाकला.
तुळशीच्या मनावरचा बराचसा भार हलका झाला होता. तिच्या आयुष्याची सार्थकता तिच्या लक्षात आली होती. उलट आता तिला या बाईचं वाईट वाटत होतं. “माझ्या मंजिऱ्यांचे वेध तिला लागलेत आणि आपल्या अंगावर असलेल्या मंजिऱ्यांना आपण कधी पाहिलंही नाही ? असं करून आपण त्या मंजिऱ्यावर किती अन्याय केला आहे. निर्मितीत सफलता नाही तिच्या जोपासानेत आहे. तेच खरं सृजन आहे. कृष्णाला जन्म देणारी देवकी पण त्याची मैया ठरली ती यशोदाच. अलभ्य गोष्टी लाभल्या तर त्याचं महत्त्व वाढायला हवं, कमी व्हायला नको.
निसर्गाच्या या पुजिकेचं जीवनही तिच्या रोपवाटिकेप्रमाणे रंग गंधाने न्हाऊन निघू दे. तिलाही सृजनाची एक संधी लवकर दृष्टीपथात येवो ही सदिच्छा !!!”




फुंकर




वाऱ्याने झुळूकीला अलगद दारात आणून सोडलं तसे वहीच्या पानाचे फाटलेले तुकडे इतस्ततः पसरले. एक फडफडलेला तुकडा दोरीवर वाळणाऱ्या फाटक्या लुगड्याच्या एका फटीत जाऊन बसला. झुळुकीने पुन्हा एक गिरकी घेतली तर रक्ताने आणि अश्रुने भिजलेला लुगड्याचा एक कोपरा तेवढा वाळला. वाळला तरी रक्ताचे डाग तसेच होते. लुगडंही मान टाकून पडून होतं... दोरीवर...
झुळुकीने आणखी अंदाज घेण्यासाठी एक गिरकी घेतली तर तांब्यावरचा पेला तेवढा कलंडला. घरंगळत लुगड्यापाशी आला, म्हणाला, ‘किती वेळ असे उसासे देत राहणार आहेस... घोटभर पाणी तरी घे.’ लुगड्यात जरा तरंग उठला. म्हणाला, ‘नको रेऽऽ काहीही, अरे सहा सहा नराधमांनी आपल्या वासना शमवल्या कोवळ्या पोरीवर ! रक्तबंबाळ केलं आणि निघून गेले. पोर निपचित पडली होती तेंव्हा पाणी पाजायलाही कोणी नव्हतं रे घरात ! टराटरा फाटतानाचा माझा आकांत तरी कोणाला कळणार होता ? आणि व्हायचं तेच झालं ना ! स्मशानात आतापर्यंत तिचा कोळसाही झाला असेल.... आणि माझी लक्तर तेवढी टांगली आहेत या दोरीवर पंचनाम्यासाठी....... मलाही का नाही जाळून टाकलं तिच्यासोबऽऽऽऽत???’’’’
ओशाळलेला पेला काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला, ‘अरे पंचनामा होणं आवश्यक आहे म्हणून...’ ‘म्हणूनच.... म्हणूनच तर म्हणतोय मी,’ विमनस्क  लुगड्याची थरथर वाढत होती. ‘अरे घरात कोण नव्हतं म्हणजे गावात कोण नव्हतं असं नाही. सगळ्यांना माहित आहेत रे ते गावगुंड. पण वेशी बाहेरच्यांनी जिभा ताणायच्या नसतात ना. म्हणून मुग गिळलेत सगळ्यांनी.....’
एक निरव शांतता पसरली. झुळूकीलाही कळत नव्हतं काय करावं ते. हतबल वारा दारा बाहेर उभं राहून सारं ऐकत होता.

‘लाडाची गोजिरी ‘मोठी’ झाली म्हणून पाहिलं लुगडं दिलं होतं तिच्या आईने. आज घरात कोण नाही म्हणून लहर आली तिला ‘मला’ नेसून बघण्याची. नेसली, तिच्यासोबत मीही नाचलो घरभर. मग तिला कविता लिहावीशी वाटली. गोणपाट घेतलं आणि फतकल मारून बसली. काहीबाही बोलता बोलता लिहीत होती, खोडत होती पुन्हा लिहीत होती वहीवर. मजेत होती. पण काही कळायच्या आत उघड्या दारातून आलेल्या नराधमांनी चार बाजूनी घेरलं तिला. वादळ शमलं तेंव्हा स्वत:च्या हाताने कविता फाडून टाकली तिने... आणि जमिनीवर गपगार होऊन पडली. किती वेळ तिच्यासोबत मीही निपचित पडलो होतो, कुणास ठाऊक ? शुद्ध आली तेंव्हा तिचा जीव तिच्या कुडीतून गेला होता आणि माझा असा टांगणीला लावला होता. तिची राख झाली आणि मी उरलोय वेदनेची वल्कलं घेऊन.....’’’’
लुगड्याला धाप लागली. पेल्याच्या कडाही ओलावल्या.....
झुळूक गिरकी घ्यायचंही विसरून गेली होती. गोजिरीच्या विखुरलेल्या कवितेचे कपटे ही स्फुंदत होते. सकाळी जमलेली कविता संध्याकाळ होईतो अशी सैरभैर झाली होती....
दारात उभ्या असलेल्या वाऱ्याकडे झुळुकीने पाहिलं, वाऱ्याने तिला निघण्याचा इशारा केला.

झुळूक दाराबाहेर पडली. पुढच्या दारातील वेदनेवर फुंकर घालण्यासाठी.....