Responsive Ad

Tuesday, 17 February 2015

फुंकर




वाऱ्याने झुळूकीला अलगद दारात आणून सोडलं तसे वहीच्या पानाचे फाटलेले तुकडे इतस्ततः पसरले. एक फडफडलेला तुकडा दोरीवर वाळणाऱ्या फाटक्या लुगड्याच्या एका फटीत जाऊन बसला. झुळुकीने पुन्हा एक गिरकी घेतली तर रक्ताने आणि अश्रुने भिजलेला लुगड्याचा एक कोपरा तेवढा वाळला. वाळला तरी रक्ताचे डाग तसेच होते. लुगडंही मान टाकून पडून होतं... दोरीवर...
झुळुकीने आणखी अंदाज घेण्यासाठी एक गिरकी घेतली तर तांब्यावरचा पेला तेवढा कलंडला. घरंगळत लुगड्यापाशी आला, म्हणाला, ‘किती वेळ असे उसासे देत राहणार आहेस... घोटभर पाणी तरी घे.’ लुगड्यात जरा तरंग उठला. म्हणाला, ‘नको रेऽऽ काहीही, अरे सहा सहा नराधमांनी आपल्या वासना शमवल्या कोवळ्या पोरीवर ! रक्तबंबाळ केलं आणि निघून गेले. पोर निपचित पडली होती तेंव्हा पाणी पाजायलाही कोणी नव्हतं रे घरात ! टराटरा फाटतानाचा माझा आकांत तरी कोणाला कळणार होता ? आणि व्हायचं तेच झालं ना ! स्मशानात आतापर्यंत तिचा कोळसाही झाला असेल.... आणि माझी लक्तर तेवढी टांगली आहेत या दोरीवर पंचनाम्यासाठी....... मलाही का नाही जाळून टाकलं तिच्यासोबऽऽऽऽत???’’’’
ओशाळलेला पेला काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला, ‘अरे पंचनामा होणं आवश्यक आहे म्हणून...’ ‘म्हणूनच.... म्हणूनच तर म्हणतोय मी,’ विमनस्क  लुगड्याची थरथर वाढत होती. ‘अरे घरात कोण नव्हतं म्हणजे गावात कोण नव्हतं असं नाही. सगळ्यांना माहित आहेत रे ते गावगुंड. पण वेशी बाहेरच्यांनी जिभा ताणायच्या नसतात ना. म्हणून मुग गिळलेत सगळ्यांनी.....’
एक निरव शांतता पसरली. झुळूकीलाही कळत नव्हतं काय करावं ते. हतबल वारा दारा बाहेर उभं राहून सारं ऐकत होता.

‘लाडाची गोजिरी ‘मोठी’ झाली म्हणून पाहिलं लुगडं दिलं होतं तिच्या आईने. आज घरात कोण नाही म्हणून लहर आली तिला ‘मला’ नेसून बघण्याची. नेसली, तिच्यासोबत मीही नाचलो घरभर. मग तिला कविता लिहावीशी वाटली. गोणपाट घेतलं आणि फतकल मारून बसली. काहीबाही बोलता बोलता लिहीत होती, खोडत होती पुन्हा लिहीत होती वहीवर. मजेत होती. पण काही कळायच्या आत उघड्या दारातून आलेल्या नराधमांनी चार बाजूनी घेरलं तिला. वादळ शमलं तेंव्हा स्वत:च्या हाताने कविता फाडून टाकली तिने... आणि जमिनीवर गपगार होऊन पडली. किती वेळ तिच्यासोबत मीही निपचित पडलो होतो, कुणास ठाऊक ? शुद्ध आली तेंव्हा तिचा जीव तिच्या कुडीतून गेला होता आणि माझा असा टांगणीला लावला होता. तिची राख झाली आणि मी उरलोय वेदनेची वल्कलं घेऊन.....’’’’
लुगड्याला धाप लागली. पेल्याच्या कडाही ओलावल्या.....
झुळूक गिरकी घ्यायचंही विसरून गेली होती. गोजिरीच्या विखुरलेल्या कवितेचे कपटे ही स्फुंदत होते. सकाळी जमलेली कविता संध्याकाळ होईतो अशी सैरभैर झाली होती....
दारात उभ्या असलेल्या वाऱ्याकडे झुळुकीने पाहिलं, वाऱ्याने तिला निघण्याचा इशारा केला.

झुळूक दाराबाहेर पडली. पुढच्या दारातील वेदनेवर फुंकर घालण्यासाठी..... 

No comments:

Post a Comment