सिडेटिव्ह
कसं वळण घेत जातं आयुष्य ! आज वयाच्या 34 व्या वर्षी मी
नव्याने प्रेमात पडलेय.
इतरांना मी सांगत आलेय There is always
a better option. आज माझ्या आयुष्यात येऊ शकेल असा सर्वात सुंदर ऑप्शन आला
आहे. पण ना तो त्यासाठी वैध आहे ना माझ्यासाठी. याचं शल्य जसं मला लागून आहे तसं
ते त्यालाही लागून असेल का ? तो रोज एसएमएस करतो आणि कधीतरी रात्रीचा इतकं बोलतो की
उलगडत जातात त्याच्या आयुष्यातील एकेक पानं आणि मी ही भानामती केल्यागत सारं काही
ऐकत असते, स्वत:त भरून घेत असते त्याचा प्रत्येक
शब्द. बोलून झालं की त्याला मी ‘हवीच’ असते. फोनवरच. नाही म्हटलं तर लटका रुसवा
त्याचा. तो ही मला हवाहवासा. मग आमची रात्र बहरत जाते. तो स्वत: सारं काही ‘फील’
करून मला ‘फील’ करायला लावतो. तो तिथे, कधी पुण्यात तर कधी पेणला आणि मी इथे
मुंबईला. पण मनाने आणि अर्थात शरीरानेही किती जवळ असतो आम्ही. अगदी एकमेकांच्या
कुशीत. त्याची दाढी माझ्या गालांना टोचत असते तर माझे मोकळे केस त्याच्या अंगा खांद्यावर
रुळत नाकातोंडात जात असतात. त्याचे हात माझ्या स्तनांवर फिरत असतात, त्यांना दाबत
असतात तर माझे हात त्याच्या मानेवरच्या केसांना लहरवतात. तो आणखी पेटतो. सुस्कारणाऱ्या
ओठांना त्याच्या ओठात चिंब करत असतो. मग त्याचे हात, बोटं, सारं काही ....... सारं
काही करत असतात. आणि रात्रीचा मधुगंध गात्रगात्र थरारवत पसरलेला असतो, मग थंडावतो,
माझ्या शांत शांत शरीरासारखा.
शरीर शांत झालं की मन विचार करू लागतं ना, म्हणून ते शांत
होणं नको. धुंदीतच राहू द्यावं. शुद्धीत येउच नये. शुद्धी सोबत बुद्धी आणि विवेक
येतो ना. काय करतोय आपण ? आपलाच आपल्याला प्रश्न ..... उत्तरही आपलंच. समर्थन
करणारं. मी केलेली चूक माझ्या पुरती तरी चूक कशी असेल ? इतरांच्या समोर मला काही
जाब द्यायचा नाहीये.... म्हणून. मी रात्रीच्या धुंदीत जशी बरोबर होते तशीच धुंदी
ओसरल्यावरही बरोबरच आहे.
खूप कल्पना येतात मनात. त्याच्या सोबत मी प्रत्यक्षात असेन
तेंव्हा कशी असेन अशी दिवास्वप्न पडतात मला. शारीर संबंध ओसरल्यावर जशी मनाला
हळुवार प्रेमाची गरज असते ती शोधण्याचा प्रयत्न करत असते मी. तो मला नेहमी म्हणतो
ना, ‘कधी भेटणार?’ म्हणून आणि मी नेहमी त्याला काही ना काही सांगून टाळत असते.
त्याला तसाही वेळ नसतोच. तो उगीचच मला भेटण्याविषयी गळ घालत असतो. पण मला हुरहूर
लागतेच भेटण्याची. कसे असतील ते दिवस जेंव्हा मी ‘प्रत्यक्षात’ त्याच्या अगदी जवळ
असेन. त्याला लोकांनी नावाजताना पाहीन. मोठं होताना पाहीन. आणि मग तो सगळं यश घेऊन
येईल माझ्या मिठीत. सोन्याने मढावी तशी त्याच्या यशाने, कौतुकाने मढून जाईन.
त्याच्या छातीवर ओठ टेकवताना माझाच उर भरून येईल. कसं होईल ? असं होईल ?
मग तो दिवसही उजाडला....
त्याच्याच एका कार्यक्रमाला त्याने मला गळ घालून बोलावून
घेतलं. ‘तुला आवडतं ना माझं भाषण मग एकदा ये ते ऐकायला. त्यानिमित्ताने तरी भेटू.’
मला ही पर्वणी वाटली. त्याने प्रवासाची सर्व व्यवस्था केली. मुरूडला एक उद्घाटन
होतं आणि दोन दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम. असं तीन दिवस एकत्र राहायला मिळणार
म्हणून मी ही सुखावले होते.
भाषण तर खूप छान झालं. त्याने उपस्थितांना नुसतं बांधून
ठेवलं. नुसतं भौतिकशास्त्र, खगोलशास्त्रच नाही तर बुद्ध आणि बाबासाहेबही. मी ही एक
श्रोताच होते, त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. मी नको तेवढी
त्याच्या प्रेमात पडले. फक्त एवढ्या लोकांसमोर ते व्यक्त करता येत नव्हतं. आमची
राहण्याची, झोपण्याची व्यवस्थाही वेगवेगळया रूममध्ये होती. त्यामुळे पहिल्या दिवशी
तसा काही फार फायदा नाही झाला. गप्पा, जेवण एकमेकांची थट्टा मस्करी आणि चर्चा यातच
दिवस गेला. संदिप मात्र मला दिवसभर पाहत होता. भेटल्या क्षणापासून, अगदी टक लावून.
पहिल्यांदाच एकमेकांना पाहत होतो. त्याला मला डोळे भरून पहायचं होतंच. त्याने किती
वेळा फोनवर बोलून दाखवलं होतं तसं. ते शक्य होत नव्हतं म्हणून तो असं पाहत होता. मला
अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटत होतं ! वाटत होतं, त्याने सरळ संयोजकांना
सांगावं की त्यांनी आम्हाला एकच रूम द्यावी. पण हे शक्य नव्हतं. संयोजकांच्या
दृष्टीने आम्ही वेगवेगळे विवाहित आणि ‘फक्त चांगले
मित्र’ होतो, त्यामुळे
वेगवेगळ्याच खोल्या येणार. त्यांना काय माहित आमच्यात होणारे रात्रीचे खेळ? म्हणून
हे आमचे डोळ्यांचे खेळ चालले होते. मी ही त्याला पाहून हरखून गेले होते. केवढा तो
अजस्त्र देह ! लांब लांब बाह्या ! अजानुबाहू, बाहुबली म्हणतात ते हेच असावं बहुधा ! आणि मी ही एवढीशी !
अॅवरेज हाईट सुद्धा नाही माझी. मी खरंतर त्याच्या मिठीत आले असते तर कोणालाही
दिसलेच नसते. कोणाला कळलंच नसतं की संदीपच्या मिठीत कोणी आहे. मग जावं का त्याच्या
कुशीत ? लोकलज्जेचा काही प्रश्नच नाही ना. अर्थात हा फक्त विचार. प्रत्यक्षात
इल्ला.
दुसऱ्या दिवशीचे सांस्कृतिक कार्यक्रम आटोपले आणि अचानक माझ्या
डोक्यात दुखू लागलं. मला कळलं मला काय होतंय ते पण सगळ्यांना सांगण्यात काहीच पॉईंट
नव्हता. फक्त संदिपला सांगितलं. मग, ‘अच्छा म्हणजे तुला डोकं आहे तर,’ वगैरे तत्सम
विनोद झाले. संदीपला सांगितलं मी सकाळपासून दोन गोळ्या घेतल्यात पण दुखणं कमी होत
नाही. हळू हळू माझे डोळे लाल होऊ लागले तसं त्याला गांभीर्य जाणवू लागलं, तो
टेन्शनमध्ये आला. डॉक्टरना बोलवा म्हणून संयोजकांना सांगू लागला. माझ्या जवळ बसला.
काय होतंय विचारू लागला. किती कमनशिबी मी ! तो इतक्या जवळ होता आणि मी त्याचं
प्रेम स्वीकारण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीतही नव्हते. पण तो जवळ होता ही
गोष्ट माझं डोकंही थोडं हलकं करीत होती. माझ्या रुममध्ये त्याने मला आणलं.
व्यवस्थित झोपवलं. मानेखालेचे केस स्वत:च सरळ केले. कपाळावरून हात फिरवू लागला.
अंग तापलंय म्हणाला. अशाही अवस्थेत माझ्या डोक्यात विचार त्याचेच होते. ‘तु जवळ
आहेस म्हणून तर अंग गरम नाही ना.’ कदाचित त्याच्याही मनात हे येत असेल. अंहं,
किंबहुना तो तर मनात म्हणतही असेल, ‘ए इतकी गरम झालीएस, डोक्यावरून काय हात
फिरवायचा ? नाभीवरून फिरवू ?’ पण तो काहीच बोलला नाही. त्याला आणि मलाही प्रसंगाचं
गांभीर्य कळत होतं.
मला माझ्या आजाराची अनाहूत भीती सतावत होती. त्याला वाटत
होतं, डोकेदुखीच तर आहे. निवळेल, त्यात काय ? मग डॉक्टर आत आले. नाडी तपासली.
स्टेथोस्कोपने हार्टबीट तपासल्या आणि म्हणाले कुठे दुखतंय डोकं ? तसं मी डॉक्टरांना
सांगून टाकलं, ‘डॉक्टर, एक सिडेटीव्ह द्या.’ डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, म्हणाले, ‘सिडेटीव्ह
? म्हणजे तुम्हाला माहित आहे तुम्हाला काय होतंय ते?’ म्हटलं ‘हो. मला इथे जास्त
वेळ रहाता येणार नाही, घरी जाते आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. तिथे पोहोचेपर्यंत
व्यवस्थित राहीन अशी सिडेटीव्ह द्या.’ संदीपला काय चाललंय तेच कळत नव्हतं. तो
म्हणालाही, ‘मुंबईला आपण दोन दिवसांनी जायचंच आहे. आता कशाला जायला हवं. डॉक्टर
औषध देतायत ना. काळजी करू नकोस. अगं साधी डोकेदुखी तर आहे. होईल ठीक.’ तसे डॉक्टरच
म्हणाले, ‘नाही जाधव साहेब, त्यांना मुंबईलाच गेलं पाहिजे, मी सिडेटीव्ह देतो.’
डॉक्टरांनी इंजेक्शन काढलं आणि टोचलं मला. संदिप सर्व पाहत होता. जाता जाता डॉक्टर
म्हणाले, ‘एक दोन तास झोप घ्या मग उठून निघालात तरी चालेल.’ डॉक्टर गेले. संदिप
माझ्या जवळ आला, ‘अरे काय हे मनु, तुला काय होतंय ते तु मला कधीच का काही बोलली
नाहीस ? अगं मी तुला असं जाऊ नाही देणार.’
मी गप्पच.
‘ठीक आहे तुला मुंबईला जायचं असेल तर मी तुझ्या सोबत
येणार.’ मग त्याला समजावताना मला भारी गेलं. मग जरा लायनीवर आला.
पण उद्विग्न झाला होता. म्हणाला, ‘मनु मला असं वाटतंय की तु
पुन्हा मला दिसणार नाहीस,’ तो गुपचूप उठला. त्याने दार आतून लावून घेतलं, कडी
लावली नी माझ्या बेडवरून मला उचलून थोडं पुढे ठेवलं. स्वत: त्या जागेवर आडवा झाला.
आणि .... आणि मला मिठीत घेतलं.
माझ्या डोळ्यावर सिडेटीव्हची धुंदी होती तरी मला सर्व दिसत
होतं, कळत होतं.
‘मनु काळजी करू नकोस. मला फक्त तुझ्या जवळ रहायचं आहे. मी
काहीहि करणार नाही.’
‘संदिप, तुम्ही काही केलं तरी त्याला प्रतिसाद देण्याएवढी
माझी ताकद आत्ता नाही. आय एम सॉरी !!!’
आणि त्याने मला कवटाळलं. कपाळावर, गालावर किस करत राहिला.
कितीतरी वेळ.
‘मनु, पुन्हा भेटशील ना ?’
‘नक्की. इतकं प्रेम कोणाला नको असेल ? त्यासाठी तरी मी
भेटेन.’
No comments:
Post a Comment