Responsive Ad

Tuesday, 17 February 2015

सृजन





अवतीभवतीचे जग सारे पुष्पलतांनी भरले
रंगगंधात तयांच्या दिवस कसे ते सरले
हेवा वाटून देवा त्यांचा एकच करते धावा
माझ्याही अंगावरती एक काटा तरी यावा....

पुन्हा एकदा सभोवार पाहून ती तोंड लपवून रडू लागली. आजूबाजूच्या पुष्पलता तिच्यावर हसताहेत असा तिला भास झाला. आपलं अधुरेपण तिला अधिकच टोचू लागलं.
जराशी नजर वर करून पाहिलं तर सारं जग वायूलहरींवर डोलत असलेलं दिसलं. गोकर्णी आणि कण्हेरी गळ्यात गळे घालून काहीतरी गुणगुणत होत्या. जाई आणि जुई वाऱ्याच्या झुळूकीवर लपंडाव खेळत होत्या. एकमेकींच्या हाती लागल्या की जोराने खिदळत होत्या. मोगरा शुभ्र वस्त्र लेऊन भीष्माप्रमाणे धीर गंभीर दिसत होता. गुलाब अगदी ऐटीत सत्ताधीशाच्या बाजात सगळीकडे पाहत होता. शेवंता आणि बकुळीला तर पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाला न्याहाळण्यातून फुरसदच नव्हती. आंबा, फणस, काजू, चिकू, पेरू, चिंच, डाळिंब आणि सीताफळ ह्या शिष्टांचं अष्टमंडळ बहुधा याहीवर्षी भरपूर फळे देण्याविषयी एखादी वार्षिक योजना आखीत असावं. पडवळ आणि काकडी सगळ्या साळकाया, माळकायांना जमवून भेंड्या लावत बसल्या होत्या.
आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीसं पाहून तिला हायसं वाटलं.
डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी...
असं स्वत:लाच समजावत तिने आपले डोळे पुसले. परार्धातील शून्ये मोजता मोजता ते विचारचक्र पुन्हा सुरु झाले.... तिला नको असलेलं.... तिच्याही नकळत.....
माझ्या आयुष्याचा अर्थ काय? माझ्या जन्माचं कारण काय? उगीचच रानातील ही जागा माझ्यामुळे अडकली गेली. इथे एखादी जुई किंवा कण्हेरी किती सुंदर दिसली असती. इतक्या सुंदर जगात मी म्हणजे एखाद्या डागासारखी दिसत असेन. छेऽ ! इथल्या प्रत्येकाला देवाने निर्मितीचं वरदान दिलं आहे. पण मी काही निर्माण करू शकत नाही, मग माझी निर्मिती कशासाठी? माझ्या निर्मितीमागचा देवाचा उद्देश काय? फुलांच्या जीवनाची सार्थकता देवाच्या पायाशी पडण्यात किंवा तरुणींच्या केसात माळण्यात आहे. फळाचं जीवन त्यांच्या सात्विक आणि अवीट गोडीत सार्थक होतंच. भाज्यांची सार्थकता त्यांच्या जीवनसत्त्वात आहेच की! मग मी? देवा मी असं काय पाप केलं होतं ते तू मला अपूर्णत्व दिलंस? वरून पूर्णत्वाची हाव दिलीस. का? मी इतरांचा हेवा करावा, मत्सर करावा म्हणून? माझा जळफळाट व्हावा म्हणून? होतोय, जळफळाट होतोय. पण त्या जळफळाटात माझी राखही होत नाही, मी काय करू ?????
आणि तिला हुंदके अनावर झाले.... कोणाला तरी ऐकायला जाईल म्हणून गळ्याशी आलेला आवंढा तिने तिथेच दाबला. डोकं अगदी सुन्न सुन्न झालं.
पक्षांच्या किलबिलाटाने तिने डोळे उघडले. पहाट झाली होती. रात्री कधी डोळा लागला कळलंच नाही. सुर्याला नमस्कार करून म्हणाली, ‘रात्री माझ्या मनात अनेक अपविचार येत होते, मला क्षमा कर.’ मन बरचसं हलकं झालं होतं.
मग तिने मनाशी पक्का विचार केला. ‘आज आपण अजिबात स्वत:ला त्रास होईल असा काही विचार करायचा नाही. आसमंतातल्या रंग गंधात न्हाऊन निघायचं.’
तेवढ्यात एक भ्रमर तिच्या एका फांदीवर येऊन बसला. हं ! फुलांच्या भोवती पिंगा घालून स्वारी थकलीय वाटतं ! त्याला पकडण्यासाठी तिने हळूच दुसरी फांदी सरसावली. हा चाणाक्ष वीर चाहूल लागताच लगेच उडालाही... त्याला उडताना पाहून ती मनमोकळी हसली. भ्रमरही आता सरावाला. दोघांमध्ये नकळत आंधळी कोशिंबीर सुरु झाली.
मग त्याला फुलांची आठवण आली आणि तो उडाला तो परत आलाच नाही. त्याची वाट पाहता पाहता बरचसं उजाडलं.
तेवढ्यात त्या दूरवरच्या आंब्याखालाचा पाचोळा वाजल्याचा आवाज आला. आवाज हळू हळू जवळ येत होता. हा आवाज बहुधा माणसाच्या पायाचा असावा. फुलं, फळं न्यायला कोणी येत असेल म्हणून तिने नेहमीप्रमाणे तिकडे दुर्लक्ष केलं.
हां हां म्हणता एक मोठा देह तिच्यासमोर उभा राहिलेला दिसला. त्याच्या हातात एक मातीने भरलेली पिशवी होती. तो उभा देह तिच्याकडे बघून हसला. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो खाली बसला. तिला दरदरून घाम फुटला. पण त्याने तिला भावपूर्ण नमस्कार केला !! आता मात्र भीतीची जागा आश्चर्याने घेतली. काही कळायच्या आत त्याने तिला मुळांसकट जमिनीपासून वेगळी केली. आपल्या त्या माती भरल्या पिशवीत ठेवली. आणि चालू लागला. जमिनीतून निघताना तिला जोरात कळ लागली होती. पण मघाची भीती पुन्हा वाटू लागल्याने तिचं दुखणं नाहीसंच झालं. आणि विचारचक्र सुरु झालं,
हा आता माझं काय करेल? हा माझा काय उपयोग करून घेणार आहे? हां ! मी बहुतेक एखादी औषधी वनस्पती असेन. म्हणजे आता हा मला कुट कुट कुटणार, नाहीतर त्या मेथीसारखं मला भाजी बनवून खाणार, बापरे !! म्हणजे आधी तर तो चाकूने कापणार, मग मला शिजवून काढणार ! हे म्हणजे भयंकरच आहे. अरे ! पण कालच तर आपण जीवनाच्या सार्थकतेच्या गोष्टी करून स्वत:लाच भंडावून सोडलं होतं. आणि आता आपलं आयुष्य सार्थकतेच्या मार्गावर असताना आपण स्वत:ला अशी भीती का घालावी? अशी माघार का घ्यावी? हे म्हणजे वीरश्रीने स्फुरलेली गाणी गाणार्या पण शत्रू समोर दिसताच हत्यार टाकून पाळणाऱ्या जवानासारखं होईल. नाही नाही, आपण या माणसाला आपल्याकडून पूर्ण सहकार्य करायचं, बस्स!
एका मोठ्या सुंदर वाड्यासमोर येऊन त्याने दिंडी दरवाजा उघडला. आत येऊन त्याने हाक मारली, ‘अहो सरकार! ऐकलं का?’ त्या हाकेने एक सुंदर प्रेमळ बाई बाहेर आली. हसतहसतच पिशवीकडे कौतुकाने पाहू लागली. तो माणूस म्हणाला, ‘हं, ही घ्या बरं तुमची अमानत. आणि करा बरं प्रतिस्थापना लवकर. फार दुरून तिकडून रानातून आणलंय यांना. जरा जपून बरं!’ असं हाणून त्याने ती पिशवी तिच्या हातात दिली. तिने पिशवी डोक्याला लावली आणि अगदी प्रेमळ शब्दात म्हणाली, ‘आमच्या अंगणात स्थापना करायचीय तुमची तुळशीमाय! इथं विसावा जरा, मी हळद कुंकू घेऊन येते.’ असं म्हणून तिला तिथेच सोप्यावर ठेऊन ती सुहास्य सुवासिनी आत गेली.
हे सगळं पाहून तिच्यापुढे प्रश्नचिन्ह नाचू लागली, ‘ही अंगणात कसली स्थापना? ते हळद कुंकू कशासाठी? आणि ही ‘तुळशीमाय’ असं काय म्हणाली? चला म्हणजे अखेर माझं बारसं झालं तर ! तुळस ! वा ! किती सुंदर आणि गोंडस नाव. तुळस !!!
आतून आलेल्या सुवासिनीने प्रथम नुसतं हळद कुंकू वाहून तुळशीला अंगणातील वृंदावनात ठेवून तिची स्थापना केली. मग तबकातील दिवा लावला. अगरबत्ती लावली आणि ती तुळशीच्या बाजूला मातीत खोवली. तुळशीला ओवाळलं. चारी बाजूने तांदूळ भिरकावले. हळद कुंकू वाहिलं. स्वत:च्या कपाळावर दोन बोटं टेकवली. तुळशीत पाणी ओतलं आणि प्रदक्षिणा घातल्या. नंतर हात जोडून म्हणाली, ‘तुळशीमाय या नव्या घरात तुझं स्वागत करते. तुझ्या अस्तित्वाने घरात सुख शांती नंदू देत. सर्व जण सुखी समाधानी असू देत.’ आणि ती तबक तांब्या घेऊन आत गेली.
वृंदावनात स्थापना झाल्यानंतर तुळशीला एवढं कळलं की तिला कुटण्यासाठी, कापण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी आणलेली नाही तर तिला रोज पुजण्यासाठी आणली आहे. म्हणजे पुन्हा जीवनाच्या सार्थकतेचा प्रश्न जैसे थेच! भांबावल्या नजरेने तिने सभोवार पाहिलं. कुंपणाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं. ते तिच्याकडे कौतुकाने पाहत होतं. तुळशीने त्याला लावून नमस्कार केला. वडानेही आशिर्वाद दिला. तिच्या प्रश्नांचं समाधान करणारं कुणीतरी तिला हवंच होतं. तिने विचारलेही, ‘वृक्षराज, मला इथे आणण्याचं कारण काय? त्या रानात मी काय वाईट होते? इथे तिथल्यासारखी सौंदर्य सृष्टीही नाही. मला तर खुपच कंटाळा येईल इथे.’ वृक्षराज उत्तरले, ‘कंटाळा यायला काय झालंय, मी आहे की तुझ्याबरोबर गप्पा मारायला. आणि हे बाकी ठीक नाही हं ! वृंदावनात बसल्यानंतर तुझं जमिनीकडे लक्ष गेलंच नाही वाटतं ? ही छोटी छोटी फुलांची रोपटी तुला दिसत नाहीत काय ? आणखी चार पाच दिवसात छानपैकी डवरतीलच ती ! तेंव्हा तुला काही इथे एकटं वाटणार नाही. आणि तुला इथे आणण्याचं कारण विचारलंस ना तू ? अगं तुळस म्हणजे सर्व स्त्रियांच्या अंगणाची शोभा असते. ती त्यांची अंगणातील मैत्रीण असते. त्यांना तुळशीचा आधार वाटत असतो. आता पहा रोज ही बाई तुझी कशी पूजा करते ते. तू नुसती रोप नाहीस तर दैवत आहेस तिचं, समजलं ?
‘हंऽऽ’ तुळशीने होकारार्थी उसासा दिला. हळूहळू तिला सर्व कळू लागलं. नवीन वातावरणातही ती रमू लागली. ही बाई झाडाफुलांची वेडी तर होतीच शिवाय चांगली जाणकारही होती. ती सर्व झाडांची चांगली निगा राखी. अंगणात येई तिच मुळी सर्व आयुधांसह. ओरपणी, खोरपणी, कापणी, छाटणी, तोडणी आणि फवारणी झाली की पाच सहा दिवसांच्या अंतराने गांडूळखत आणि त्याचं पाणी घाले. सुंदर रोपवाटिका तर होतीच शिवाय एका चौकोनात पालक आणि कोथिंबीर होती. कुंपणांच्या उत्तर-पूर्व कोपर्यात एक कडुनिंब लावला होता. प्रसन्न प्रसन्न आसमंत होता.
दिवस सरत होते, महिने सरत होते. तुळशीची प्रतिस्थापना होऊन एक दीड वर्ष झालं असावं. एक दिवस तुळस फार वैतागलेली होती. सकाळपासूनच खूप बेचैन होती. सारखी घराच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाटत होतं, ‘आपल्याला दैवत करून या अंगणात, या वृंदावनात अगदी बंदिस्त करून टाकलंय या बाईने ! घरात काय चाललंय काही कळतच नाहीये !!’ तिची बेचैनी पाहून वटवृक्षाला रहावलं नाही. त्याने तिला विचारलंही, ‘काय गं ! अशी बेचैन का दिसतेयस काय झालंय?’ ती म्हणाली, ‘बरं झालं तुम्हीच विचारलात ते. आज मी तुम्हाला विचारणारच होते. वृक्षराज, मला बरेच दिवसापासून एक गोष्ट सतावते आहे. ही बाई रोज माझी पूजा करते. वृंदावन सारवते, पाणी घालते. पण ही कधी कधी चार चार दिवस नजरेस पडत नाही. आणि पाचव्या दिवशी समोर आली, पूजा झाली की हमसुनहमसुन रडते. आजही तीन दिवस झाले ती दिसलीच नाहीये. तिचा अंगणातला वावर किती जिवंतपणा आणत असतो. आणि ती अशी फिरकलीच नाही ना कि इथे स्मशानशांतता असते.’
‘अच्छा.... ही समस्या आहे होय तुझी ! अगं, ती रागावली आहे तुझ्यावर !’
तुळस बावरली, ‘रागावली आहे ? माझ्यावर ? म.... मी काय केलंय तिचं ?’
वृक्षराज शांतपणे म्हणाले, ‘तू काही केलं नाहीस. ती तुझ्यावरच नाही तर माझ्यावर, निसर्गावर आणि देवावरही रागावली आहे. ज्या चार दिवसात ती अंगणात येत नाही त्या चार दिवसात ती आपणा सर्वांवर रागावलेली असते. कोणाचं तोंड पाहण्याची सुद्धा तिला इच्छा नसते. ती आपल्या सर्वाना वाळीत टाकते.’ वृक्षराजही हेलावले !
‘पण ती असं का करते ?’ तुळशीचा प्रश्न अपेक्षित होताच. ‘आणि नंतर रडते कशाला?’
‘हं, हे बघ तुळसे, ही सतत निसर्गाची, निसर्गातल्या सजीवांची, निर्जीवांची पूजा करत असते. पण जेंव्हा निसर्गच तिच्यावर उलटतो ना तेंव्हा तिच्या हातात या रागावण्याखेरीज काहीच नसतं. बघ, या निसर्गाने या सर्व सजीव सृष्टीला जन्माला घातलं आणि आपल्यापासून दुसऱ्या एका सजीवाची निर्मिती करून त्या निसर्गाचं सृजन करणं हे सर्व सजीवांचं कर्तव्य आहे. आणि सगळे या कर्तव्याचं यथाशक्ती पालनही करतात. हे कर्तव्य फक्त कर्तव्यच नसतं. तर इच्छा आणि हक्कही असतो त्या प्रत्येक सजीवाचा. पण जेंव्हा निसर्गच त्यांचा हा हक्क हिरावून घेतो तेंव्हा कर्तव्य आणि इच्छा या दोन्हीवर कुऱ्हाड कोसळते. आणि मग स्वत:च्या नशिबावर रडण्याखेरीज काहीच उरत नाही. अंकुर फुटताना फांदीला वेदना होतातच पण त्या वेदान तृप्ततेला घेऊन येतात, याची जाणीव ज्यांना अंकुर फुटत नाही त्यांनाही असते. त्या जाणीवेसाठी, त्या इच्छेसाठी आणि त्या हक्कासाठी मग अशी निसर्गाची मनधरणी सुरु होते. पण काही गोष्टींपुढे निसर्गही हतबल असतो. त्याचं चक्र अविरतपणे सुरु असतं. पण सर्वानांच तो सर्व अधिकार देत नाही. ज्यांना ते मिळत नाही ते या सुवासिनी प्रमाणे चार – चार दिवस सर्वांशी अबोला धरतात. पण पाचव्या दिवशी मात्र ‘अगदीच काही निसर्ग आपल्यावर कोपणार नाही.’ या विश्वासाने त्या तुझ्यासारख्या एखाद्या दैवी मैत्रिणीकडे आपल्या दु:खाला मार्ग मोकळा करून देतात. आणि सर्जकतेचं ते वरदान मागतात.’
‘सर्जकतेचं वरदान ? ते मी काय देणार ? मी स्वत:च निसर्गाच्या कोपाची शिकार आहे. एका बुडणाऱ्याने दुसऱ्या बुडणाऱ्याला वाचवल्याचं कधी ऐकलंय का तुम्ही?’ तुळशीचा संभ्रम कायम होता. पण वटवृक्षाकडे सर्व प्रश्नांची उत्तरं होती.
‘तुझ्या दृष्टीने तुझं म्हणणं बरोबरच आहे. पण ही माणसं असतात ना ही प्रतिकांची पूजा करण्यातच दंगलेली असतात. माझंच पहा ना ! मी वृक्षराज. वटवृक्ष म्हणतात मला. माझ्या फांद्या तोडताना सत्यवानाला मृत्यू आला आणि त्याचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाला सावित्रीने आर्त विनंती केली. तिच्या विनंतीने, आर्ततेने यमाचे मन द्रवले. आणि त्याने सत्यावानाला जीवदान दिले. या कथेचा मी प्रतिक. का? तर हा सगळा प्रकार एक वडाखाली घडला म्हणून. मला एक सांग, सावित्रीची विनंती यमाने धुडकावून लावली असती तर माझ्या पूजेऐवजी मला जाळण्याची प्रथा पडली नसती कशावरून? किंवा हे कथानक वडाखाली न होता एखाद्या आंब्याच्या किंवा फणसाच्या झाडाखाली घडलं असतं तर आज त्यांना ‘आंबा सावित्री’ किंवा ‘फणस सावित्री’ असं काही तरी सणाचं नाव ठेऊन पुजलं नसतं?
खरंतर यांनी यमाची म्हणजे मृत्यूची पूजा करायला हवी. ‘तू माझ्या प्रिय जनांचे अवेळी प्राण न्यायला येशील तेंव्हा माझ्या आर्ततेने तुझे मन असेच द्रवू दे आणि माझ्या प्रिय जनांना जीवदान मिळू दे’ अशी पूजा त्यांनी करायला हवी. पण तसं न होता या सर्व स्त्रिया माझीच पूजा करतात. तुझंही तसंच आहे. तू सुद्धा एक प्रतिक आहेस. तू म्हणतेस तुला सर्जकतेच वरदान नाही. मग तुझ्या मंजिऱ्या आहेत त्या काय आहेत ?’’
‘मंजिऱ्या या मंजिऱ्या आहेत, फुलं किंवा फळं नाहीत.’ तुळस कळवळली.
वृक्षराज ममतेने बोलू लागले. अगं वेडे, गुलाबाच्या सौंदर्याला भुलून त्याच्यासारखे फुल नाही तर नाही पण तसले काटे तरी अंगावर यावेत असं वाटणाऱ्या तुला मंजिऱ्यांचं महत्त्व कळू नये ? अगं या मंजिऱ्यांचा परिमळ स्वयंपाक घरातल्या स्त्रीला तुझं अस्तित्त्व सांगत असतो. मंजिऱ्या सुंदर नसतीलही पण त्यांनीच तुला पालवी फुटण्याची जाणीव होते ना ? तुझ्या आयुष्याच्या सफलतेचं प्रतिक आहेत या मंजिऱ्या, हे लक्षात घे. कस्तुरी मृगासारखी भरकटत जाऊ नकोस. तुला देवत्त्व, मातृत्त्व देणाऱ्या या मंजिऱ्याकडे एकदा ममतेच्या दृष्टीने बघ. तुला कळेल की हे तुझेच अंकुर आहेत. गुलाबापेक्षा सुंदर, जुईपेक्षा मोहक आणि मोगऱ्याहूनही सुवासिक.
खरंच वृक्षराज ! या मंजिऱ्यांकडे माझं विशेष लक्ष गेलं नाही. या तर माझ्याच आहेत, माझी निर्मिती, माझं सृजन !!! तुळस आनंदली.

पाहिलंस, सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवितात. ही बाई रोज तुझी पूजा करते ते तू तिला काही भव्यदिव्य द्यावं म्हणून नाही. तर तुझ्या मंजिऱ्यां सारख्या मंजिऱ्या तिलाही लाभाव्यात म्हणून. वृक्षाराजांनी उच्छ्वास टाकला.
तुळशीच्या मनावरचा बराचसा भार हलका झाला होता. तिच्या आयुष्याची सार्थकता तिच्या लक्षात आली होती. उलट आता तिला या बाईचं वाईट वाटत होतं. माझ्या मंजिऱ्यांचे वेध तिला लागलेत आणि आपल्या अंगावर असलेल्या मंजिऱ्यांना आपण कधी पाहिलंही नाही ? असं करून आपण त्या मंजिऱ्यावर किती अन्याय केला आहे. निर्मितीत सफलता नाही तिच्या जोपासानेत आहे. तेच खरं सृजन आहे. कृष्णाला जन्म देणारी देवकी पण त्याची मैया ठरली ती यशोदाच. अलभ्य गोष्टी लाभल्या तर त्याचं महत्त्व वाढायला हवं, कमी व्हायला नको.
निसर्गाच्या या पुजिकेचं जीवनही तिच्या रोपवाटिकेप्रमाणे रंग गंधाने न्हाऊन निघू दे. तिलाही सृजनाची एक संधी लवकर दृष्टीपथात येवो ही सदिच्छा !!!




फुंकर




वाऱ्याने झुळूकीला अलगद दारात आणून सोडलं तसे वहीच्या पानाचे फाटलेले तुकडे इतस्ततः पसरले. एक फडफडलेला तुकडा दोरीवर वाळणाऱ्या फाटक्या लुगड्याच्या एका फटीत जाऊन बसला. झुळुकीने पुन्हा एक गिरकी घेतली तर रक्ताने आणि अश्रुने भिजलेला लुगड्याचा एक कोपरा तेवढा वाळला. वाळला तरी रक्ताचे डाग तसेच होते. लुगडंही मान टाकून पडून होतं... दोरीवर...
झुळुकीने आणखी अंदाज घेण्यासाठी एक गिरकी घेतली तर तांब्यावरचा पेला तेवढा कलंडला. घरंगळत लुगड्यापाशी आला, म्हणाला, ‘किती वेळ असे उसासे देत राहणार आहेस... घोटभर पाणी तरी घे.’ लुगड्यात जरा तरंग उठला. म्हणाला, ‘नको रेऽऽ काहीही, अरे सहा सहा नराधमांनी आपल्या वासना शमवल्या कोवळ्या पोरीवर ! रक्तबंबाळ केलं आणि निघून गेले. पोर निपचित पडली होती तेंव्हा पाणी पाजायलाही कोणी नव्हतं रे घरात ! टराटरा फाटतानाचा माझा आकांत तरी कोणाला कळणार होता ? आणि व्हायचं तेच झालं ना ! स्मशानात आतापर्यंत तिचा कोळसाही झाला असेल.... आणि माझी लक्तर तेवढी टांगली आहेत या दोरीवर पंचनाम्यासाठी....... मलाही का नाही जाळून टाकलं तिच्यासोबऽऽऽऽत???’’’’
ओशाळलेला पेला काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला, ‘अरे पंचनामा होणं आवश्यक आहे म्हणून...’ ‘म्हणूनच.... म्हणूनच तर म्हणतोय मी,’ विमनस्क  लुगड्याची थरथर वाढत होती. ‘अरे घरात कोण नव्हतं म्हणजे गावात कोण नव्हतं असं नाही. सगळ्यांना माहित आहेत रे ते गावगुंड. पण वेशी बाहेरच्यांनी जिभा ताणायच्या नसतात ना. म्हणून मुग गिळलेत सगळ्यांनी.....’
एक निरव शांतता पसरली. झुळूकीलाही कळत नव्हतं काय करावं ते. हतबल वारा दारा बाहेर उभं राहून सारं ऐकत होता.

‘लाडाची गोजिरी ‘मोठी’ झाली म्हणून पाहिलं लुगडं दिलं होतं तिच्या आईने. आज घरात कोण नाही म्हणून लहर आली तिला ‘मला’ नेसून बघण्याची. नेसली, तिच्यासोबत मीही नाचलो घरभर. मग तिला कविता लिहावीशी वाटली. गोणपाट घेतलं आणि फतकल मारून बसली. काहीबाही बोलता बोलता लिहीत होती, खोडत होती पुन्हा लिहीत होती वहीवर. मजेत होती. पण काही कळायच्या आत उघड्या दारातून आलेल्या नराधमांनी चार बाजूनी घेरलं तिला. वादळ शमलं तेंव्हा स्वत:च्या हाताने कविता फाडून टाकली तिने... आणि जमिनीवर गपगार होऊन पडली. किती वेळ तिच्यासोबत मीही निपचित पडलो होतो, कुणास ठाऊक ? शुद्ध आली तेंव्हा तिचा जीव तिच्या कुडीतून गेला होता आणि माझा असा टांगणीला लावला होता. तिची राख झाली आणि मी उरलोय वेदनेची वल्कलं घेऊन.....’’’’
लुगड्याला धाप लागली. पेल्याच्या कडाही ओलावल्या.....
झुळूक गिरकी घ्यायचंही विसरून गेली होती. गोजिरीच्या विखुरलेल्या कवितेचे कपटे ही स्फुंदत होते. सकाळी जमलेली कविता संध्याकाळ होईतो अशी सैरभैर झाली होती....
दारात उभ्या असलेल्या वाऱ्याकडे झुळुकीने पाहिलं, वाऱ्याने तिला निघण्याचा इशारा केला.

झुळूक दाराबाहेर पडली. पुढच्या दारातील वेदनेवर फुंकर घालण्यासाठी..... 

इतकंच

इतकंच....

तुझ्या झोळीत काय ??
   माझ्या झोळीत नैराश्य !
तुझ्या झोळीत काय ??
   माझ्या झोळीत वैराग्य !!
तुझ्या झोळीत काय ??
   माझ्या झोळीत यातना !!
तुझ्या झोळीत काय ??
   माझ्या झोळीत तिरस्कार !!
तुझ्या झोळीत काय ??
   माझ्या झोळीत अपमान !!
तुझ्या झोळीत काय ??
   माझ्या झोळीत हतबलता !!

   बस्स..... बस्स .....
   तू साऱ्यांना विचारतोस
   आता तू सांग, तुझ्या झोळीत काय ??
‘माझ्या झोळीत ? माझ्या झोळीत
लाकडं, केरोसिनची बाटली आणि काडेपेटी’
..... आँ कशासाठी ? ! ? ! ? !
‘तुमच्या झोळ्या पेटवण्यासाठी’
..... खरंच तू जाळू शकशील यांना ? !!
‘हो पण तुम्ही तुमच्या झोळ्या अशा हृदयाला कवटाळू नका ....
तुमच्या निर्धाराशिवाय त्या यमसदनी पोहोचू शकणार नाही
नुसती बोलाची कढी तुमच्या चेतना चेतना चेतवू शकणार नाही
मला तुमची साथ द्या ...... नवे रस्ते खोदणारे हात द्या’

ही पहा मी पेटवली होळी
टाका तिच्यात आपली धिंडवड्यांची झोळी
हो.... पण जरा जपून
नाहीतर हे झोळीबंद विंचू माझ्यावरच फुत्कारतील
ही लालचावलेली गिधाडे माझेच लचके तोडतील
आणि तुम्ही जाल पळून
‘ज्याने मृगजळातून काढलं त्यालाच
पाणीऽऽ पाणीऽऽ करायला लावलं’
हा इतिहास आहे.
त्याची पुनरावृत्ती व्हायला नको

इतकं आणि इतकंच .....


Sedative

सिडेटिव्ह

कसं वळण घेत जातं आयुष्य ! आज वयाच्या 34 व्या वर्षी मी नव्याने प्रेमात पडलेय. 
इतरांना मी सांगत आलेय There is always a better option. आज माझ्या आयुष्यात येऊ शकेल असा सर्वात सुंदर ऑप्शन आला आहे. पण ना तो त्यासाठी वैध आहे ना माझ्यासाठी. याचं शल्य जसं मला लागून आहे तसं ते त्यालाही लागून असेल का ? तो रोज एसएमएस करतो आणि कधीतरी रात्रीचा इतकं बोलतो की उलगडत जातात त्याच्या आयुष्यातील एकेक पानं आणि मी ही भानामती केल्यागत सारं काही ऐकत असते, स्वत:त भरून घेत असते त्याचा प्रत्येक शब्द. बोलून झालं की त्याला मी ‘हवीच’ असते. फोनवरच. नाही म्हटलं तर लटका रुसवा त्याचा. तो ही मला हवाहवासा. मग आमची रात्र बहरत जाते. तो स्वत: सारं काही ‘फील’ करून मला ‘फील’ करायला लावतो. तो तिथे, कधी पुण्यात तर कधी पेणला आणि मी इथे मुंबईला. पण मनाने आणि अर्थात शरीरानेही किती जवळ असतो आम्ही. अगदी एकमेकांच्या कुशीत. त्याची दाढी माझ्या गालांना टोचत असते तर माझे मोकळे केस त्याच्या अंगा खांद्यावर रुळत नाकातोंडात जात असतात. त्याचे हात माझ्या स्तनांवर फिरत असतात, त्यांना दाबत असतात तर माझे हात त्याच्या मानेवरच्या केसांना लहरवतात. तो आणखी पेटतो. सुस्कारणाऱ्या ओठांना त्याच्या ओठात चिंब करत असतो. मग त्याचे हात, बोटं, सारं काही ....... सारं काही करत असतात. आणि रात्रीचा मधुगंध गात्रगात्र थरारवत पसरलेला असतो, मग थंडावतो, माझ्या शांत शांत शरीरासारखा.

शरीर शांत झालं की मन विचार करू लागतं ना, म्हणून ते शांत होणं नको. धुंदीतच राहू द्यावं. शुद्धीत येउच नये. शुद्धी सोबत बुद्धी आणि विवेक येतो ना. काय करतोय आपण ? आपलाच आपल्याला प्रश्न ..... उत्तरही आपलंच. समर्थन करणारं. मी केलेली चूक माझ्या पुरती तरी चूक कशी असेल ? इतरांच्या समोर मला काही जाब द्यायचा नाहीये.... म्हणून. मी रात्रीच्या धुंदीत जशी बरोबर होते तशीच धुंदी ओसरल्यावरही बरोबरच आहे.

खूप कल्पना येतात मनात. त्याच्या सोबत मी प्रत्यक्षात असेन तेंव्हा कशी असेन अशी दिवास्वप्न पडतात मला. शारीर संबंध ओसरल्यावर जशी मनाला हळुवार प्रेमाची गरज असते ती शोधण्याचा प्रयत्न करत असते मी. तो मला नेहमी म्हणतो ना, ‘कधी भेटणार?’ म्हणून आणि मी नेहमी त्याला काही ना काही सांगून टाळत असते. त्याला तसाही वेळ नसतोच. तो उगीचच मला भेटण्याविषयी गळ घालत असतो. पण मला हुरहूर लागतेच भेटण्याची. कसे असतील ते दिवस जेंव्हा मी ‘प्रत्यक्षात’ त्याच्या अगदी जवळ असेन. त्याला लोकांनी नावाजताना पाहीन. मोठं होताना पाहीन. आणि मग तो सगळं यश घेऊन येईल माझ्या मिठीत. सोन्याने मढावी तशी त्याच्या यशाने, कौतुकाने मढून जाईन. त्याच्या छातीवर ओठ टेकवताना माझाच उर भरून येईल. कसं होईल ? असं होईल ? 

मग तो दिवसही उजाडला....

त्याच्याच एका कार्यक्रमाला त्याने मला गळ घालून बोलावून घेतलं. ‘तुला आवडतं ना माझं भाषण मग एकदा ये ते ऐकायला. त्यानिमित्ताने तरी भेटू.’ मला ही पर्वणी वाटली. त्याने प्रवासाची सर्व व्यवस्था केली. मुरूडला एक उद्घाटन होतं आणि दोन दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम. असं तीन दिवस एकत्र राहायला मिळणार म्हणून मी ही सुखावले होते.
भाषण तर खूप छान झालं. त्याने उपस्थितांना नुसतं बांधून ठेवलं. नुसतं भौतिकशास्त्र, खगोलशास्त्रच नाही तर बुद्ध आणि बाबासाहेबही. मी ही एक श्रोताच होते, त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. मी नको तेवढी त्याच्या प्रेमात पडले. फक्त एवढ्या लोकांसमोर ते व्यक्त करता येत नव्हतं. आमची राहण्याची, झोपण्याची व्यवस्थाही वेगवेगळया रूममध्ये होती. त्यामुळे पहिल्या दिवशी तसा काही फार फायदा नाही झाला. गप्पा, जेवण एकमेकांची थट्टा मस्करी आणि चर्चा यातच दिवस गेला. संदिप मात्र मला दिवसभर पाहत होता. भेटल्या क्षणापासून, अगदी टक लावून. पहिल्यांदाच एकमेकांना पाहत होतो. त्याला मला डोळे भरून पहायचं होतंच. त्याने किती वेळा फोनवर बोलून दाखवलं होतं तसं. ते शक्य होत नव्हतं म्हणून तो असं पाहत होता. मला अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटत होतं ! वाटत होतं, त्याने सरळ संयोजकांना सांगावं की त्यांनी आम्हाला एकच रूम द्यावी. पण हे शक्य नव्हतं. संयोजकांच्या दृष्टीने आम्ही वेगवेगळे विवाहित आणि फक्त चांगले मित्र होतो, त्यामुळे वेगवेगळ्याच खोल्या येणार. त्यांना काय माहित आमच्यात होणारे रात्रीचे खेळ? म्हणून हे आमचे डोळ्यांचे खेळ चालले होते. मी ही त्याला पाहून हरखून गेले होते. केवढा तो अजस्त्र देह ! लांब लांब बाह्या ! अजानुबाहू, बाहुबली म्हणतात ते हेच असावं बहुधा ! आणि मी ही एवढीशी ! अॅवरेज हाईट सुद्धा नाही माझी. मी खरंतर त्याच्या मिठीत आले असते तर कोणालाही दिसलेच नसते. कोणाला कळलंच नसतं की संदीपच्या मिठीत कोणी आहे. मग जावं का त्याच्या कुशीत ? लोकलज्जेचा काही प्रश्नच नाही ना. अर्थात हा फक्त विचार. प्रत्यक्षात इल्ला.

दुसऱ्या दिवशीचे सांस्कृतिक कार्यक्रम आटोपले आणि अचानक माझ्या डोक्यात दुखू लागलं. मला कळलं मला काय होतंय ते पण सगळ्यांना सांगण्यात काहीच पॉईंट नव्हता. फक्त संदिपला सांगितलं. मग, ‘अच्छा म्हणजे तुला डोकं आहे तर,’ वगैरे तत्सम विनोद झाले. संदीपला सांगितलं मी सकाळपासून दोन गोळ्या घेतल्यात पण दुखणं कमी होत नाही. हळू हळू माझे डोळे लाल होऊ लागले तसं त्याला गांभीर्य जाणवू लागलं, तो टेन्शनमध्ये आला. डॉक्टरना बोलवा म्हणून संयोजकांना सांगू लागला. माझ्या जवळ बसला. काय होतंय विचारू लागला. किती कमनशिबी मी ! तो इतक्या जवळ होता आणि मी त्याचं प्रेम स्वीकारण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीतही नव्हते. पण तो जवळ होता ही गोष्ट माझं डोकंही थोडं हलकं करीत होती. माझ्या रुममध्ये त्याने मला आणलं. व्यवस्थित झोपवलं. मानेखालेचे केस स्वत:च सरळ केले. कपाळावरून हात फिरवू लागला. अंग तापलंय म्हणाला. अशाही अवस्थेत माझ्या डोक्यात विचार त्याचेच होते. ‘तु जवळ आहेस म्हणून तर अंग गरम नाही ना.’ कदाचित त्याच्याही मनात हे येत असेल. अंहं, किंबहुना तो तर मनात म्हणतही असेल, ‘ए इतकी गरम झालीएस, डोक्यावरून काय हात फिरवायचा ? नाभीवरून फिरवू ?’ पण तो काहीच बोलला नाही. त्याला आणि मलाही प्रसंगाचं गांभीर्य कळत होतं.
मला माझ्या आजाराची अनाहूत भीती सतावत होती. त्याला वाटत होतं, डोकेदुखीच तर आहे. निवळेल, त्यात काय ? मग डॉक्टर आत आले. नाडी तपासली. स्टेथोस्कोपने हार्टबीट तपासल्या आणि म्हणाले कुठे दुखतंय डोकं ? तसं मी डॉक्टरांना सांगून टाकलं, ‘डॉक्टर, एक सिडेटीव्ह द्या.’ डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, म्हणाले, ‘सिडेटीव्ह ? म्हणजे तुम्हाला माहित आहे तुम्हाला काय होतंय ते?’ म्हटलं ‘हो. मला इथे जास्त वेळ रहाता येणार नाही, घरी जाते आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. तिथे पोहोचेपर्यंत व्यवस्थित राहीन अशी सिडेटीव्ह द्या.’ संदीपला काय चाललंय तेच कळत नव्हतं. तो म्हणालाही, ‘मुंबईला आपण दोन दिवसांनी जायचंच आहे. आता कशाला जायला हवं. डॉक्टर औषध देतायत ना. काळजी करू नकोस. अगं साधी डोकेदुखी तर आहे. होईल ठीक.’ तसे डॉक्टरच म्हणाले, ‘नाही जाधव साहेब, त्यांना मुंबईलाच गेलं पाहिजे, मी सिडेटीव्ह देतो.’ डॉक्टरांनी इंजेक्शन काढलं आणि टोचलं मला. संदिप सर्व पाहत होता. जाता जाता डॉक्टर म्हणाले, ‘एक दोन तास झोप घ्या मग उठून निघालात तरी चालेल.’ डॉक्टर गेले. संदिप माझ्या जवळ आला, ‘अरे काय हे मनु, तुला काय होतंय ते तु मला कधीच का काही बोलली नाहीस ? अगं मी तुला असं जाऊ नाही देणार.’
मी गप्पच.

‘ठीक आहे तुला मुंबईला जायचं असेल तर मी तुझ्या सोबत येणार.’ मग त्याला समजावताना मला भारी गेलं. मग जरा लायनीवर आला.
पण उद्विग्न झाला होता. म्हणाला, ‘मनु मला असं वाटतंय की तु पुन्हा मला दिसणार नाहीस,’ तो गुपचूप उठला. त्याने दार आतून लावून घेतलं, कडी लावली नी माझ्या बेडवरून मला उचलून थोडं पुढे ठेवलं. स्वत: त्या जागेवर आडवा झाला.
आणि .... आणि मला मिठीत घेतलं.

माझ्या डोळ्यावर सिडेटीव्हची धुंदी होती तरी मला सर्व दिसत होतं, कळत होतं.
‘मनु काळजी करू नकोस. मला फक्त तुझ्या जवळ रहायचं आहे. मी काहीहि करणार नाही.’
‘संदिप, तुम्ही काही केलं तरी त्याला प्रतिसाद देण्याएवढी माझी ताकद आत्ता नाही. आय एम सॉरी !!!’
आणि त्याने मला कवटाळलं. कपाळावर, गालावर किस करत राहिला. कितीतरी वेळ.
‘मनु, पुन्हा भेटशील ना ?’
‘नक्की. इतकं प्रेम कोणाला नको असेल ? त्यासाठी तरी मी भेटेन.’

आणि त्याचा हात पुन्हा प्रत्यक्षात, खरोखरचा, वर्च्युअल नाही रिअल, माझ्या सर्वांगावरून फिरू लागला. त्याचे ओठ माझ्या सर्वांगाला चिंब करू लागले. खूप खूप सुखावत होते मी. ती धुंदी कसली होती, सिडेटीव्हची ? की संदीपच्या श्वासांची,,,,, त्याच्या स्पर्शाची,,,, मला कळत नव्हतं. 


करवंदी

करवंदी

काळ्या करवंदीच्या समोरून एक फुलपाखरू उडून गेलं,
ते थेट हिरव्यागार पेरुतरूवर जाऊन बसलं.
काळी करवंदी हिरमुसली,
हसत असली तरी कसनुसली...
काट्यांच्या संभारात येईल कसं कोणी ?
काळ्या पडद्याखालची मुसमुसलेली लाली पाहील कसं कोणी ?
काळ्या करवंदीच्या मनात थोडी कालवाकालव झाली....
‘फुलपाखरूच ते, उडणारच’ अशी उगीच सारवासारव केली....
उड्या मारत बागडत काही मुलं तिथे आली.
काटा टाळून अलगदपणे करवंदे जमा केली.
कण्हणार्या, चिकारलेल्या करवंदांनी मग एकमेकांना मिठ्या मारल्या....
जगलो वाचलो तर भेटू म्हणत भावना आवरल्या
मुलांनी मग अगतिक झालेल्या करवंदीच्या जखमेवर मीठ चोळलं....
जास्तच गोड असलेल्या करवंदीने थोडं चुरचुरीत व्हावं म्हणून....
इतक्या सायासाने करवंदीही सुरकुतली....
द्रोणामध्ये बंद झाली तेंव्हा शेवटची घटका मोजू लागली.....
५/५ रुपयांना विकली गेली, तेंव्हा म्हणून गेली ‘याचसाठी केला होता अट्टाहास....’
खाणार्याने पापण्या मिटून आस्वाद घेत तिला गिळंकृत केलं....
आणि प्रेमाची आस अन् विरून जाण्याच्या ध्यासाने संपून गेली करवंदी....
अवीट गोडवा मागे ठेऊन....